पुणे :
‘देशभरामध्ये कुठेही जातीय, धार्मिक तणाव निर्माण झाला तरी पुणेकरांनी कायम जातीय, धार्मिक सलोखा ठेवून शांतता प्रस्थापित ठेवलेली आहे. मागील काही महिन्यांपासून देशभरामध्ये एकूणच अहिष्णूतेचे वातावरण असताना पुण्यात त्याचे पडसाद पडलेले नव्हते. मात्र काल फर्गसन महाविद्यालयामध्ये झालेल्या तणावामुळे शहरातील सलोख्याचे वातावरण बिघडू शकते. सध्या सुरू असलेला परीक्षांचा काळ पाहता कोणत्याही महाविद्यालयाने राजकीय रंग असलेल्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये; किंबहुना अशा संघटनांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्रवेश बंदी करावी’, असे आवाहन खा.वंदना चव्हाण यांनी केले आहे.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या आंबेडकरवादी संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असं पत्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी डेक्कन पोलिसांना पाठवलं आहे.या पार्श्वभूमीवर वंदना चवान यांनी हे निवेदन माध्यमांना पाठविले आहे .
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुद्दामहून विद्यार्थ्यांची दिशाभूल होईल अशी खोटी माहिती पसरवून कॅम्पसचा गैरवापर करीत आहेत. या देशातील कोणताही युवक देशविरोधी घोषणा देणार नाही. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी विरोधी गटाला देशद्रोही ठरविणे हे अत्यंत गंभीर आहे.
पोलीस आणि महाविद्यालयीन प्रशासनाने पक्षपाती भुमिका न घेता, शहराची शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घ्यावा. विनाकारण विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत. सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पुण्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत’ असेही त्या म्हणाल्या.

