पुणे कोवीडमुक्त करण्याचा निर्धार
पुणे – कोवीडग्रस्त झालेले पुणे कोवीडमुक्त बनविण्याचा आमचा संकल्प आहे, त्यात यश आल्यास साऱ्या देशवासीयांनाच दिलासा मिळेल आणि याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धार पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्यासह पुण्यातील आमदारांनी व्यक्त केला असून, याकरिता पुण्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी तीस वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात यावी अशी मागणी पत्रात केली आहे.
पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रावर खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, आ.भीमराव तापकीर, आ.माधुरी मिसाळ, आ.सिद्धार्थ शिरोळे, आ.मुक्ता टिळक आणि आ.सुनिल कांबळे यांच्या सह्या आहेत. पुण्यात कोवीडचा प्रादुर्भाव वाढला असून सद्यस्थितीत तेवीस हजारहून अधिक केसेस अॅक्टिव्ह आहेत, अशी माहिती या पत्रात देण्यात आली आहे.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून, पूर्वेकडचे ऑक्सफर्ड अशी पुण्याची ओळख आहे. येथे लक्षावधी विद्यार्थी शिक्षण घेत असतात. २०१९च्या कोवीडच्या पहिल्या लाटेत येथील शैक्षणिक संस्था बंद होत्या. अलिकडेच त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या. पण, साथीचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा त्या बंद कराव्या लागल्या आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शिक्षण व्यवस्थेवर झालेला आहे. तसेच, पुणे शहर हे महाराष्ट्रातील आर्थिक केंद्र आहे. मात्र, कोवीडच्या लाटेमुळे येथील व्यापार-उद्योगावर वारंवार निर्बंध येत असल्याने अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला असून त्याचा परिणाम पुण्याभोवतालच्या छोट्या-छोट्या गावे आणि शहरांवरही झालेला आहे. कोवीडवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. गेल्या दोन महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून अडीच लाख नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. हा वेग साथ नियंत्रणाच्या दृष्टीने कमी आहे. नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी यासाठी तीस वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण व्हावे. यामुळे पुणे कोवीडमुक्त होऊन, देशातील मॉडेल बनेल. त्यातूनच येथील अर्थकारण सावरुन पुणे आरोग्यसंपन्न होईल. पुण्यात आरोग्यविषयक साधनसामग्री उपलब्ध आहे, डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे, नागरिक सजग आहेत. ते उत्स्फूर्तपणे लसीकरण मोहिमेत भाग घेतील. कोवीड लस निर्मिती करणारी सीरम इन्स्टिट्यूट पुण्यातीलच असून तिचाही पुरेपूर उपयोग करता येईल. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, भाजपचे कार्यकर्ते लसीकरणाची व्यापक मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रीय राहू अशी ग्वाही पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आली आहे.
कोवीडच्या साथीमुळे सर्वाधिक ग्रस्त झालेले पुणे जर कोवीडमुक्त झाले तर, देशातील उर्वरित भागांसाठी ही दिलासादायक बाब असेल. यासाठी तीस वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचा निर्णय आपण त्वरीत घ्यावा. अशी विनंती पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

