वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या प्रभावी निर्मितीला प्रेक्षकवर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने अंबरनाथमधील अंबरभरारी संस्थेने सुरु केलेल्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये यंदा वर्णन पिक्चर्स प्रस्तुत वाल्या टू वाल्मिकी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, बालकलाकार व बालचित्रपट असे तीन पुरस्कार पटकावत या महोत्सवात आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे. वाल्या टू वाल्मिकी चित्रपटाला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे – सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- वाल्या टू वाल्मिकी, सर्वोत्कृष्ट अभिनेता – मिलिंद शिंदे , सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वरुण बालिगा
गावदेवी मैदानात रंगलेल्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवात मिळालेल्या या पुरस्कारांबाबत निर्माते श्रीकांत शेणॅाय यांनी आनंद व्यक्त केला. श्रीकांत शेणॅाय निर्मित, संजय कसबेकर आणि पंकज भिवाजी दिग्दर्शित वाल्या टू वाल्मिकी या चित्रपटात विचित्र परिस्थितीत अडकलेल्या माऊली या मुलाची कथा मांडली आहे. माऊलीच्या प्रवासात माऊलीला भेटणाऱ्या व्यक्ती त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी देतात याची भावस्पर्शी कथा वाल्या टू वाल्मिकी चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा-संवाद मनिष कदम यांचे असून छायाचित्रण राज रेवणकर यांनी केलं आहे. गीते प्रवीण दामले यांची असून अश्विन भंडारे यांचं संगीत चित्रपटाला लाभलं आहे. या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या शुभांगी शेणॅाय आहेत. मिलिंद शिंदे, संजय खापरे, पंकज विष्णू, मौसमी तोंडवळकर, संजय कसबेकर, बालकलाकार वरुण बाळीगा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.