पुणे पीपल्स बँकेची सन २०२२-२०२७ निवडणूक ; ‘सहकार पॅनल’ वर विजय
पुणे : पुणे पीपल्स को ऑप. बँकेची सन २०२२-२०२७ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते व संचालकांच्या ‘उत्कर्ष पॅनल’ ने बाजी मारली आहे. ‘उत्कर्ष पॅनल’ ने संत तुकाराम कारखान्याचे संचालक उत्तम दगडे यांचे ‘सहकार पॅनल’ वर प्रत्येक उमेदवारामागे साधारणतः ३५०० मतांच्या फरकाने एकतर्फा विजय मिळविला आहे.
उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार व बँकेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते व प्रचारप्रमुख विजयकांत कोठारी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलने विजय मिळविला आहे. पॅनेलने ४ नवीन चेह-यांना संधी दिली असून त्यामध्ये दोन महिला आहेत. उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार व बँकेचे विद्यमान संचालक बबन भेगडे, विद्यमान अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, विद्यमान संचालक सीए जर्नादन रणदिवे, डॉ. रमेश सोनावणे, बिपीनकुमार शहा, मिलिंद वाणी, निशा करपे, सुभाष गांधी, सुभाष नडे, श्रीधर गायकवाड, संजीव असवले, वैशाली छाजेड -कोठारी, विश्वनाथ जाधव हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले असून त्यांची संचालकपदी निवड झाली आहे.
उत्कर्ष पॅनेलच्या उमेदवारांना सरासरी ५२३० मते तर, सहकार पॅनेलच्या उमेदवारांना सरासरी १७०० च्या आसपास मते मिळाली. पुणे, मावळ, चिंचवड, दौंड, ठाणे आणि बेळगाव या सहा ठिकाणी मतदान केंद्रावर एकूण ६९७७ पात्र मतदान झाले. तर, १९२ मते अपात्र ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (ग्रामीण) मिलिंद सोबले यांनी काम पाहिले.
विद्यमान अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, सन २००७ साली पहिल्यांदा निवडून आलेल्या विद्यमान संचालक मंडळाने सर्व सभासदांच्या विश्वासाने आणि सहमतीने मागील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली. तथापि त्यावेळी संधी दिलेल्या संचालकांना बॅंकींगपेक्षा पदांमध्येच स्वारस्य असल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले. तथापि झालेल्या निवडणुकीत देखील मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला बॅंकेच्या सेवेची संधी दिली आहे. आम्ही हा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू.
गेल्या १५ वर्षात एकूण भाग भांडवल रुपये ३ कोटीवरून रुपये २३ कोटी, राखीव निधी ४० कोटी रुपयांवरून १६१ कोटी रुपये, ठेवी २७३ कोटीवरून १२७३ कोटी रुपयांच्या, तर एकूण कर्ज ही १३१ कोटींवरून ८०० कोटी रुपयांपर्यंत तर नफा १.८१ कोटी वरून १५.८९ कोटी पर्यंत वाढलेला आहे. बँकेला सतत अ वर्ग मिळाला आहे व निव्वळ एनपीए १ टक्का च्या आसपास आहे. बँकेच्या प्रगतीचा आलेख हा कायम चढत्या क्रमाने प्रगतीकडेच गेला आहे. आम्ही यापुढेही असेच उत्तम काम करू.