तातडीची मदत म्हणून एक लाखाची मदत-
डॉ. उषा काकडेंकडून होर्डिंग कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शिवाजी परदेशींच्या कुटुंबियांचे सांत्वन-
पुणे: होर्डिंग कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या रिक्षाचालक शिवाजी परदेशी यांची बारावी विज्ञान शाखेत शिकणारी समृद्धी व चार वर्षांचा समर्थ आई-वडिलांचे छत्र हरविल्याने अक्षरश: पोरकी झालेत. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच भविष्यातील वाटचालीची गंभीर समस्या त्यांच्यासमोर उभी राहिली असतानाच युएसके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. उषा काकडे यांनी पोरक्या झालेल्या या दोन्ही मुलांना मोठा आधार दिला आहे. तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश समृद्धी व तिच्या आजीकडे सुपूर्त करतानाच या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे डॉ. उषा काकडे यांनी यावेळी सांगितले.
आईच्या अस्थि विसर्जन करून येत असलेल्या वडिलांवर गेल्या शुक्रवारी होर्डिंग कोसळून काळाने घाला घातला, वडील शिवाजी परदेशी यांचा यामध्ये मृत्यू झाला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. समृद्धी बारावी विज्ञान शाखेत शिकत असून तिचा भाऊ समर्थ हा अवघा चार वर्षांचा आहे. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या समृद्धी व समर्थच्या घरात वयस्कर आजी आहे. मणक्यात अंतर पडल्याने त्यादेखील काम करु शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीत आलेल्या समृद्धी, समर्थ व तिच्या आजीची युएसके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. उषा काकडे यांनी आज त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश देत समृद्धी व समर्थच्या पुढील संपूर्ण शिक्षणाचा खर्च आपण करु असे सांगून त्यांना धीर दिला.
लहानग्या समर्थला आपल्या आई-वडिलांचे नेमके काय झाले आहे हे समजत नाही. तो वारंवार आई-वडील कोठे गेलेत? ते घरी कधी येणार आहेत? असे प्रश्न करीत असतो. डॉ. उषा काकडे यांच्या भेटीवेळी देखील त्याच्या चेहऱ्यावरील भाव उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारेच होते. डॉ. उषा काकडे यांनी त्याला कडेवर घेत त्याला धीर दिला. तसेच, यापुढे कोणत्याही प्रकारची अडचण आली तर, माझ्याशी संपर्क साधा असेही डॉ. उषा काकडे यांनी समृद्धी व तिची आजी रुख्मिणी यांना सांगितले. भाजपचे माजी नगरसेवक मनीष साळुंके यांनी या भेटीचे नियोजन केले होते.

