ठाणे, दि. ९ : आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक केक कापले गेले, इथे येता येता गाडीत बसूनही कापले पण याठिकाणी येऊन या मुलांसोबत कापलेल्या केकची गोडी वेगळीच आहे, अशी कबुली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. निमित्त होत ते त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजऱ्या केलेल्या वाढदिवसाचे.. ठाणे शहरात बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र असलेल्या ‘स्वयम’ या संस्थेत जाऊन विशेष मुलांसोबत त्यांनी हा दिवस साजरा केला. यावेळी या संस्थेतील विशेष मुलांसोबत केक कापून त्यांनी भरवलाच पण त्यासोबतच त्यांना खायला खाऊ आणि भेटवस्तूही दिल्या.
स्वयम ही संस्था गेली 16 वर्षे शहरात विशेष बहुविकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवते. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस याच शाळेत जाऊन अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.
संस्थेतील ही बहूविकलांग मुलांच्या चेहऱ्यावर खास पाहुणा भेटीला आल्याचे कळल्यावर विशेष आंनद झळकत होता. या मुलांसोबत साहेबांनी केक कापून करून त्यानंतर त्याच्याशी संवाद साधला. तसेच या निमित्ताने आपल्यासोबत आणलेल्या खाऊ आणि खास भेटवस्तूंचे वाटपही केले.
आजच्या या विशेष दिनी स्वयम संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या ‘भरारी आत्मविश्वासाची’.. या विशेष पुस्तिकेचे अनावरण मंत्री शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच या पुस्तिकेसोबतच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि योगाचार्य अण्णा व्यवहारे यासारख्या मान्यवर तज्ज्ञांनी या मुलांचं पालकत्व कसं निभावून न्यावं याबाबतचे मार्गदर्शन करणाऱ्या पाच सीडींच्या संचाचे प्रकाशन देखील त्यांच्याच हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका आणि सिडीच्या माध्यमातून जी मुले आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे कोणत्याही संस्थेत अथवा शाळेत दाखल होऊ शकत नाहीत त्यांना कशारीतीने सांभाळावे, त्यांना कसे हाताळावे त्यांच्याशी वागाताना बोलताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी विशेष मुलांची काळजी घेणे, त्यांना सांभाळणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे काम सोपे नाही. या कामासाठी अत्यंत चिकाटी आणि समर्पणाची भावना लागते. या मुलांना निसर्गाने काही गोष्टी दिल्या नाहीत मात्र त्यांच्यात काही कलागुण नक्की असतात हे कलागुण शोधून त्याना वाव देणे हे आशा संस्थांचे काम असते. ते काम स्वयम गेली 16 वर्षांपासून अव्याहतपणे करत आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. या मुलांना हाताळण्याचे प्रशिक्षण देणेही गरजेचे असते. या संस्थेच्या माध्यमातून हे काम होत असल्याचे विशेष समाधान वाटत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. समजात विशेष मुलांची संख्या मोठी असून त्यांना सांभाळणाऱ्या आशा संस्थांची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आशा संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, स्वयम संस्थेचे संचालक नीता आणि राजीव देवळाणकर आणि या शाळेतील मुलांचे पालक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.