अभिनेता उपेंद्र लिमये चोखंदळ भूमिकेसाठी ओळखला जातो.तो सध्या गायक संगीतकाराच्या भूमिकेत पहायला मिळनार आहे. . हार्मोनियम सोबतचा फोटो बघून सध्या तो गायक संगीतकार झाला आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. नेहमीच निरनिराळ्या भूमिका करण्याला प्राधान्य देणारा उपेंद्र अशीच एक वेगळी भूमिका ‘प्रीतम’ या आगामी चित्रपटातून साकारणार आहे. त्यासाठीच त्याने हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे. संगीतातील त्याचे हे नवं पाऊल आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी असून उपेंद्र लिमये याचा हटके अंदाज यात पहायला मिळतो आहे. येत्या १९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पावलो म्हसोबा रे’ ‘धावलो पिसोबा रे’ असे बोल असलेलं ‘प्रीतम’ चित्रपटातील हे गाणं अभिनेता उपेंद्र लिमये व प्रणव रावराणे यांच्यावर चित्रित झालं आहे.
उपेंद्र लिमये याच्यासोबत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी ‘प्रीतम’ मध्ये पहायला मिळणार आहे. अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
‘प्रीतम’ चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे. ‘अॅड फिल्म मेकर’ सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून शंकर महादेवन, अभय जोधापूरकर, मनिष राजगिरे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

