पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करून पुन्हा छत्रपतींचा अवमान करण्यात येत असल्याची टिका राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज येथे केली .
जगताप यांनी आपल्या पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले यांचे मार्फत यांच्या मार्फत पाठविलेल्या इ प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे कि,’ पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पानिपत होणार आहे याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण करण्यात येत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची एकही संधी स्वतः नरेंद्र मोदींनीही सोडली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्राने देशाला कोरोना दिला असे वक्तव्य करत त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचा अवमान केला. संघाचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. ही ‘छिंदम’ प्रवृत्ती भाजप आणि आरएसएस च्या नसानसांत भिनलेली आहे. असे असतानाही मतांचे राजकारण करण्यासाठी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा आवर्जून वापर भाजपकडून होतो.महानगरपालिका आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून हा कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्याचा भाजपचा डाव आहे. पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे, पुणे शहरात शिवरायांचं बालपण गेलं, असं असताना पुतळ्याचे अनावरण भव्यदिव्य सोहळ्यात होणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता केवळ नरेंद्र मोदी व भाजप यांच्यापुरता हा सोहळा मर्यादित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.हा शिवद्रोह आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही येत्या ६ मार्च रोजी याचा तीव्र निषेध करणार आहोत याची भारतीय जनता पक्षाने नोंद घ्यावी.असेही जगताप यांनी म्हटले आहे.