250/320 केव्हीए पट्ट्यातील निर्मितीद्वारे उच्च केव्हीए प्रकारात स्थान बळकट
कमी उत्सर्जनासाठी जनरेटर्स सीआरडी इंजिनने सज्ज
मुंबई, 6 नोव्हेंबर 2017 – एकोणीस अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहाच्या महिंद्रा पॉवरॉल या कंपनीने आज 250/320 केव्हीए या पट्ट्यातील डिझेल जनरेटरची निर्मिती करत असल्याचे जाहीर करून उच्च केव्हीए डिझेल जनरेटर प्रकारात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. हे जनरेटर महिंद्रा एमपॉवर मालिकेतील असून, चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅली या संशोधन आणि विकास केंद्रात विकसित झाले आहेत, तर पुण्याजवळील चाकण येथे त्याचे उत्पादन करण्यात आले आहे. हा 9.3 लिटर इंजिन प्रकार महिंद्रा पॉवरॉलच्या एमपॉवर मालिकेत नव्याने दाखल झाला असून, त्यामध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत असे सीआरडी इंजिन आहे.
सीआरडी इंजिनना उत्कृष्ट आणि प्रगत अशा कॉमन रेल डिझेल इंजिन (सीआरडीई) तंत्रज्ञानाने सक्षम केले जाते. हे तंत्रज्ञान भविष्यसज्ज असून, उच्च कामगिरी आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखले जाते. ते प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करणारे आणि प्रमाणित उत्सर्जन निकषांपेक्षाही अधिक कार्यक्षम आहे. हेच प्रगत तंत्रज्ञान नव्याने आणलेल्या 250 केव्हीए आणि 320 केव्हीए डिझेल इंजिन संचांत वापरण्यात आले आहे.
250 केव्हीए डिझेल जनरेटरची किंमत 12.5 लाख रुपये अधिक जीएसटी (एक्स-वर्क) आणि 320 केव्हीए डिझेल जनरेटरची किंमत 16 लाख रुपये अधिक जीएसटी (एक्स-वर्क) एवढी आहे.
या वेळी बोलताना महिंद्रा अँड महिंद्राच्या पॉवरॉल आणि स्पेअर्स व्यवसायाचे अध्यक्ष – चीफ पर्चेस ऑफसर हेमंत सिक्का म्हणाले, ‘आजच्या या सादरीकरणामुळे उच्च केव्हीए डिझेल जनरेटर प्रकारात आमचा आमच्या स्वतःच्या इंजिनसह प्रवेश झाला आहे. आमच्यासाठी यामुळे एक नवे क्षेत्र आणि ग्राहकवर्ग खुला झाला आहे. आमच्या ग्राहकांना प्रगत आणि सहज उपलब्ध होणारे तंत्रज्ञान पुरविण्याचा आमचा महिंद्रामध्ये सातत्याने प्रयत्न असतो. सीआरडीई तंत्रज्ञानयुक्त 250/320 केव्हीए या पट्ट्यातील डिझेल जनरेटरची निर्मिती ही याच प्रयत्नांचे मूर्त रूप आहे. भविष्यसज्ज अशा या सीआरडीई तंत्रज्ञानामुळे कमी किमतीत कमी उत्सर्जन आणि उच्च कामगिरी साधली जाणार असून, यामुळे ग्राहककेंद्रित्वाचा निकषही उंचावला जाईल. अभिनवतेची कास आम्ही सातत्याने धरू आणि महिंद्रा पॉवरॉलद्वारे सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा पुरवत राहू.’
स्मार्ट सेवेसह स्मार्ट डिझेल जनरेटर
महिंद्रा पॉवरॉलच्या डिझेल जनरेटर संचांची क्षमता अधिक असून, ते अधिक भार असलेल्या कामांसाठी उपयोगी आहेत. हे नवे डिझेल जनरेटर संच डिजि-सेन्स तंत्रज्ञानाने युक्त असून, त्यामुळे ते स्मार्टही आहेत. या स्मार्ट संचांच्या कामगिरीवर कोठूनही लक्ष ठेवता येत असल्याने त्यांची कार्यक्षमता सुधारते.
डिझेल जनरेटर संचांच्या खरेदीचा निर्णय हा सेवेचे जाळे आणि विक्रीपश्चात सेवेबाबत असलेल्या कटिबद्धतेवर अवलंबून असतो. महिंद्रा पॉवरॉल डिझेल जनरेटर संचांना तर देशभरात 200 हून अधिक डीलर्स आणि 400 टच पॉइंट्स असलेल्या सर्वांत मोठ्या सेवा जाळ्याचे पाठबळ आहे.
ग्राहकांना मदत पुरविण्यासाठी अहोरात्र सुरू राहणारे सुसज्ज केंद्रीय कॉल सेंटरही आहे. ग्राहकांना कमीत कमी वेळात सर्वोत्तम सल्ला देण्यासाठी येथे तज्ज्ञांचे पथकही असते.
महिंद्रा पॉवरॉलने डिझेल जनरेटर संच कोरल ऑरेंज रंगांत उपलब्ध करून दिले आहेत.
महिंद्रा पॉवरॉलबाबत
सन 2001-02 मध्ये कंपनीने ऊर्जानिर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. आर्थिक वर्ष 2002 पासून 2016-17 पर्यंत व्यवसायाची वाढ 1250 कोटी रुपयांवर गेली. सध्या महिंद्रा पॉवरॉलची इंजिन्स 5 केव्हीएपासून 320 केव्हीएपर्यंतच्या डिझेल जनरेटिंग संचांना बळ पुरवत आहेत.
महिंद्रा पॉवरॉलने स्थापनेपासून अतिशय कमी कालावधीतच भारतीय जनरेटर संच उद्योगात वेगाने पावले टाकली आहेत. देशभरातील, तसेच जगातीलही आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांचा महिंद्रा पॉवरॉल डिझेल जनरेटर संच हा प्राधान्याचा पर्याय आहे.
टोटल क्वालिटी मॅनेजमेंटची यशस्वी अंमलबजावणी करणा-या उद्योगांना गौरविणा-या युनियन ऑफ जॅपनीज सायन्टिस्ट्स अँड इंजिनीअर्स या संस्थेचा जागतिक दर्जाचा डेमिंग प्राइज हा पुरस्कार महिंद्रा पॉवरॉलला सन 2014 मध्ये प्राप्त झाला.
याशिवाय महिंद्रा पॉवरॉलला फ्रॉस्ट अँड सलिव्हान व्हॉइस ऑफ कस्टमर पुरस्कार, मास्टर ब्रँड, पॉवर ब्रँड आणि सुपरब्रँड पुरस्कार हे पुरस्कारही मिळाले आहेत.
दूरसंचार कंपन्यांव्यतिरिक्त महिंद्रा पॉवरॉल डिझेल जनरेटर संच भारतीय आणि जागतिक बाजारपेठेतील बँका, बांधकाम क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, रुग्णालये, हॉटेल्स, घरे आणि उत्पादन कंपन्यांना बळ देत आहेत.
महिंद्राबाबत
महिंद्रा समूह हा 19 अब्ज अमेरिकन डॉलर उलाढाल असलेल्या कंपन्यांची शिखर संस्था असून, तो नावीन्यपूर्ण उत्पादनांद्वारे लोकांना अधिक कार्यक्षम होण्यासाठी, ग्रामीण आणि शहरी जीवनशैली अधिक समृद्ध करण्यासाठी, नवे व्यवसाय रुजविण्यासाठी आणि विविध समुदायांना बळ देण्यासाठी झटतो. बहुपयोगी वाहने, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा आणि व्हेकेशन ओनरशिप या क्षेत्रांत या कंपनीचे आघाडीचे स्थान असून, ही जगातील आकाराने सर्वांत मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. त्याशिवाय शेती व्यवसाय, कंपोनंट्स, सल्लासेवा, संरक्षण, उर्जा, लॉजिस्टिक्स, वाहतूक, एअरोस्पेस, स्थावर मालमत्ता, रिटेल, स्टील, व्यापारी उपयोगाची वाहने आणि दुचाकी व्यवसायात कंपनीचे स्थान मजबूत आहे. भारतात मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत मिळून दोन लाख कर्मचारी काम करतात.