पुणे– भाषांतर हा पूर्ण वेळ व्यवसाय होऊ शकतो, याबाबत जागृती करण्यासाठी आणि व्यावसायिक; तसेच आश्वासक भाषांतरकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारतातील भाषा सेवा उद्योगातील आघाडीची कंपनी बिट्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे बिट्स वार्षिक भाषा उद्योग पारितोषिकांची सन 2011 मध्ये सुरुवात करण्यात आली.
बिट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर यांची ही संकल्पना असून, दर वर्षी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त 30 सप्टेंबरला ही पारितोषिके देण्यात येतात. भाषांतर आणि स्थानिकीकरण उद्योगातील यशस्वी व्यक्तींची दखल घेणे, तसेच भाषांतराकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन रूजवणे असे यामागे उद्देश आहेत. त्याचप्रमाणे व्यावसायिक भाषांतरकारांबरोबर काम करण्याचे महत्त्व काय असते, याची उभरत्या भाषांतरकारांना आणि भाषा उद्योगाच्या ग्राहकांना जाणीव करून द्यावी, अशीही या पारितोषिकांमागची कल्पना आहे.
यंदा माधुरी हेगडे यांना ‘बिट्स लँग्वेज प्रोफेशनल ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना स्मृतिचिन्ह आणि 21 हजार रुपये रोख असे पारितोषिक मिळाले. सुनंदा महाजन या यंदाच्या ‘बिट्स स्पेशल रेकग्निशन अवॉर्ड’च्या मानकरी ठरल्या. त्यांना स्मृतिचिन्ह आणि 11 हजार रुपये रोख असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. योगिता तहिलराम यांना ‘बिट्स अस्पायरिंग लँग्वेज प्रोफेशनल ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि पाच हजार रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे त्यांना देशभरातील काही सर्वोत्तम भाषांतरकार काम करत असलेल्या बिट्स या कंपनीमध्ये उमेदवार म्हणून काम करण्याची संधीही मिळणार आहे. या उमेदवारीदरम्यान त्यांना कामाचे मानधन, तसेच भाषा उद्योगाशी संबंधित अनेक कौशल्ये आत्मसात करण्याच्या संधीही मिळतील.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जर्मन फेडरल असोसिएशन ऑफ एसएमईजचे भारतातील प्रमुख मनोज बर्वे आणि बिट्स प्रा. लि.चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना मनोज बर्वे म्हणाले, ‘भाषा व्यावसायिकांची दखल घेणारा देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आयोजित करत असल्याबद्दल मी बिट्सचे आभार मानतो. भाषा व्यावसायिकांची मागणी दिवसेंदिवस वाढणारच आहे. भाषा व्यावसायिकांनी अधिकाधिक सर्जनशील, उत्स्फूर्त आणि संधींच्या शोधात राहिले पाहिजे.’
बिट्स प्रा. लि.चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर म्हणाले, ‘खरा भारत हा खेड्यांत दिसतो, असे म्हणतात, त्याप्रमाणे उद्योजकता, नवता आणि व्यवसाय हे ख-या अर्थाने लघु आणि मध्यम उद्योगांत रुजतात. देशातील 4 कोटी 80 लाखांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग हे त्यांचा व्यवसाय स्थानिक आणि जागतिक पातळीवर विस्तारू पाहत आहेत. अशा वेळी एका मोठ्या बाजारपेठेला आवाहन करण्यासाठी इंग्रजी, भारतीय बाजारपेठांत रुजण्यासाठी प्रादेशिक भाषा आणि परदेशांत पोहोचण्यासाठी परकीय भाषा यांची आवश्यकता असल्याने त्यासाठी भाषा, भाषांतर आणि स्थानिकीकरण ही हळूहळू त्यांची सर्वांत मोठी साधने बनत आहेत.’ लघु आणि मध्यम उद्योगांना नव्या बाजारपेठांत शिरकाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भाषासाह्य’ या नव्या उपक्रमाविषयीही त्यांनी माहिती दिली.