पुणे: पेट्रोल आणि डिझेल या खर्चिक आणि प्रदूषण करणा-या इंधनांचा वापर कमी करत भारतीय अर्थव्यवस्था इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल यांसारख्या पर्यायी इंधनांवर प्रगत व्हावी यासाठी ठोस प्रयत्न आणि कृती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. पर्यायी इंधने तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल (फीड स्टॉक ) भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन श्री गडकरी यांनी केले.
येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ने आयोजित केलेल्या १६ व्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान विषयक दिवसांच्या परिषदेच्या (सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी) दुस-या दिवशी श्री गडकरी यांनी पर्यायी इंधने, इलेक्ट्रिक वाहने, देशातील वाहतूक समस्या याबाबत सरकारने योजलेल्या उपायांची तसेच धोरणांची माहिती दिली. संस्थेच्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे, केंद्रीय नीती आयोगाच्या मिथेनॉल विषयक समितीचे सदस्य प्रशांत गुरुश्रीनिवास, द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट (TERI ) चे महासंचालक श्री अजय माथूर तसेच परिषदेचे निमंत्रक ए बादुशा या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मिथेनॉल उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोळशाच्या राखेपासून, भाताच्या तसेच अन्य पिकांच्या ताटापासून किंवा जंगलात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींपासून मिथेनॉल ची निर्मिती करता येईल, असे सांगून श्री गडकरी म्हणाले, की मिथेनॉल इंधन वापरणा-या वाहनाचा प्रति किलोमीटर खर्च खूपच कमी आहे. देशात मिळणा-या पेट्रोल मध्ये १५ टक्के मिथेनॉल मिसळण्याच्या शक्यतेची पडताळणी करण्याच्या कार्यक्रमाचा श्री गडकरी यांनी शुभारंभ केला. पुण्यात ARAI मध्ये मिथेनॉल विषयक संशोधनासाठी रस्ते वाहतूक खात्याच्या निधीतून एक प्रगत संशोधन केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स ) सुरु करण्याची घोषणाही त्यांनी केली.
देशात शेती क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन होत असताना अशा उत्पादनाचा वापर इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल अशा पर्यायी इंधनाची निर्मिती करण्यासाठी केला पाहिजे यावर भर देत श्री गडकरी यांनी सांगितले की अशी पर्यायी इंधननिर्मिती करणे उद्योगांना आर्थिकदृष्ट्या आकर्षक व्हावे यासाठी सरकार उपाययोजना करील. पर्यायी इंधनाचे १००० कारखाने सुरु करता येतील एवढा कच्चा माल भारताच्या शेतीक्षेत्रातून मिळू शकेल आणि त्यातून शेतक-यांचे अनेक प्रश्न सुटायला मदत होईल असे श्री गडकरी म्हणाले.
ARAI च्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी पेट्रोल मध्ये १५ टक्के मिथेनॉल मिश्रण करण्यासाठी होत असलेल्या चाचण्यांची माहिती दिली. असे मिश्र इंधन वापरून चाललेल्या वाहनांतून उत्सर्जन कमी होते तसेच ही वाहने प्रति लिटर जास्त अंतर कापतात असे निदर्शनाला आल्याचे सांगितले. खास पाहणीसाठी चालवलेल्या दुचाकी तीनचाकी आणि मोटारी यांच्यावर या चाचण्या झाल्या आणि आता चालू वापरातल्या ववाहनांवर या चाचण्या होतील असे त्या म्हणाल्या.
श्री. गुरुश्रीनिवास म्हणाले की मिथेनॉल चा ईंधन म्हणून वापर यशस्वी झाला तर २०३ पर्यंत भारताची कच्चे तेल आयात करण्याची गरज २० टक्क्यांनी कमी होईल. वीजनिर्मितीनंतर तयार होणा-या कोळशाच्या राखेपासून मिथेनॉल उत्पादन करणारा एक प्रकल्प येत्या तीन वर्षात सुरु होणार आहे असे त्यांनी सांगितले.
परिषदेचे निमंत्रक श्री अकबर बादुशा यांनी उपस्थितांचे आभार मानले. शुक्रवारी परिषदेच्या समारोपाच्या सत्रात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री श्री अनंत गीते यांचे प्रमुख भाषण होईल.