‘पिफ बझार’ अंतर्गत असलेले ‘स्मिता पाटील पॅव्हेलियन’ हे यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण
- पुण्यातील महत्वाच्या पाच शैक्षणिक संस्थाचेही यावर्षी ‘पिफ’ला सहकार्य
पुणे, २ जानेवारी: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ‘वर्ल्ड कॉम्पिटिशन फिल्मस्’ विभागाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या १४ चित्रपटांची नावे महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषित केली. याबरोबरच यावर्षी पहिल्यांदाच साकारण्यात येणा-या ‘पिफ बझार’ अंतर्गत असलेले ‘स्मिता पाटील पॅव्हेलियन’ व पुण्यातील महत्वाच्या पाच शैक्षणिक संस्थांचे महोत्सवाला लाभलेले सहकार्य हेही यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण असल्याचे डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केले.
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर समर नखाते, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, खजिनदार राजेंद्र केळशीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून ‘स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय आहे. हा महोत्सव येत्या १४ ते २१ जानेवारी दरम्यान रंगणार असून पुणे शहरातील कोथरूड सिटी प्राईड, सातारा रस्ता सिटी प्राईड, आर डेक्कन सिटी प्राईड, मंगला मल्टीप्लेक्स, कॅम्प मधील आयनॉक्स, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व पिंपरी-चिंचवड मधील जय गणेश आयनॉक्स या ठिकाणी महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार आहेत.
यावेळी बोलताना जब्बार पटेल म्हणाले की, ”यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटांच्या समावेशाची प्राथमिक निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून यामधील ‘वर्ल्ड कॉम्पिटिशन फिल्मस्’ या विभागात विविध देशांतील तब्बल १००० चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. ज्यामधून या १४ चित्रपटांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. याच १४ चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ रुपये १० लाख व ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक’ पुरस्कार रुपये ५ लाख प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबरच प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या एका चित्रपटास देखील पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.”
ते पुढे म्हणाले की, ”यंदा प्रथमच या महोत्सवास शहरातील प्रख्यात पाच शैक्षणिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, महाराष्ट्र इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), भारती विद्यापीठ आणि डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस आदी संस्थांचा समावेश आहे.”
याशिवाय यंदाच्या वर्षी ‘पिफ बझार’ ही एक नवीन संकल्पना महोत्सवा अंतर्गत साकारण्यात येणार असून मुळची पुण्याची असलेली प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या स्मरणार्थ साकारण्यात येणारे ‘स्मिता पाटील पॅव्हेलियन’ हे यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण ठरेल. ‘पिफ बझार’ मध्ये महोत्सवाच्या प्रायोजकांचे स्टॉल्स् तर असतीलच याबरोबरच चित्रपटांशी संबंधित कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनेक मान्यवर चित्रपटांविषयीची त्यांची मते उपस्थितांसमोर मांडतील. याशिवाय या ठिकाणी चित्रपट क्षेत्राशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र असे व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात आले असून यावर ते आपली कला सादर करू शकणार आहेत. याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले चित्रपट क्षेत्रातील दिग्गज माध्यमांशी याच ठिकाणी संवाद साधतील असेही पटेल यावेळी म्हणाले.
१४ व्या ‘पिफ’ महोत्सवात सुमारे ६५ देशांमधून आलेले २८० चित्रपट दाखविले जाणार आहेत. या चित्रपटांचे पुणे शहर आणि पिंपरी – चिंचवड येथील ७ सिनेमागृहातील १३ पडद्यांवर ३५० हून अधिक शोज होणार आहेत.
‘फोक्सवॅगन स्टुडंट इंटरनॅशनल’ या स्पर्धे अंतर्गत १३ चित्रपट हे अॅनिमेशन विभागात तर १८ चित्रपट हे मुख्य स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. या विभागात विजेत्या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १००० अमेरिकन डॉलर्स, उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायांकन, ध्वनीमुद्रण यासाठी प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटास (भारत) १००० अमेरिकन डॉलर्स आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट (आंतरराष्ट्रीय) १००० अमेरिकन डॉलर्स अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
यावर्षीच्या महोत्सवात ‘कंट्री फोकस’ विभागामध्ये ‘टर्की’ या देशावर आधारित चित्रपटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ विभागामध्ये ब्राझीलचे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक हेक्टर बेबेंन्को यांचे सात चित्रपट, डेन्मार्कचे प्रसिद्ध दिग्दर्शक नील्स मलम्रोस यांचे सहा व भारतीय दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट महोत्सवा दरम्यान दाखविण्यात येतील. याबरोबरच ‘इंडियन सिनेमा’ या विभागात १३ भारतीय चित्रपट दाखविण्यात येतील तर ‘जेम्स फ्रॉम एनएफएआय’ या विभागा अंतर्गत ‘क्लासिक रिस्टोअर्ड चित्रपट’ दाखविण्यात येणार आहेत. याखेरीज ‘कॅलिडोस्कोप’ विभागात २६ चित्रपट आणि लॅटिन अमेरिका या विभागात १८ चित्रपट दाखविण्यात येतील. तसेच ‘ग्लोबल सिनेमा’ या विभागात कांन्स, बर्लिन, टोरान्टो यांसारख्या महोत्सवा अंतर्गत वाखाणल्या गेलेल्या सुमारे ७८ चित्रपटांचा समावेश असेल. तसेच ‘एशियन फिल्म्स’ या विभागात दाखविल्या जाणारे ७ चित्रपट ‘क्लब महिंद्रा’ यांच्यातर्फे प्रायोजित करण्यात येणार आहेत.
‘एमआयटी गृप ऑफ इन्स्टिट्य़ुशन्स’ यांच्या फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन संस्थेचे विद्यार्थी हे महोत्सवाचे व्हिडिओग्राफर्स म्हणून तर बिझनेस मॅनेजमेंट संस्थेचे विद्यार्थी हे महोत्सवादरम्यान स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय एमआयटीचे कार्यकारी संचालक असलेल्या राहुल कराड यांच्या पुढाकाराने एमआयटीच्या डिझाईन स्कूल व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी ‘पिफ’ च्या कॅटलॉगसाठी मोलाची मदत केली आहे. भारती विद्यापीठचे सचिव डॉ. विश्वजीत कदम यांनी महोत्सवातील ‘स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ या संकल्पने अंतर्गत दाखविण्यात येणारे दहा चित्रपट प्रायोजित केले असून भारती विद्यापीठाच्या छायाचित्र विभागाचे विद्यार्थी यावर्षीच्या महोत्सवाचे छायाचित्रकार म्हणून काम पाहतील.
तसेच डॉ. विद्या येरवडेकर मुख्य संचालक असलेल्या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठच्या वतीने ‘ह्युमन माईण्ड अॅण्ड सिनेमा’ हा विभाग प्रायोजित करण्यात येणार असून या अंतर्गत ५ चित्रपट दाखविण्यात येतील. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या पुढाकाराने ‘लिटरेचर आणि सिनेमा’ या विभागातील पाच चित्रपटही प्रायोजित करण्यात येणार आहेत.
डीएसके इंटरनॅशनल कॅम्पसच्या विपणन प्रमुख तन्वी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अॅनिमेशन विभागातील सहा चित्रपट प्रायोजित करणार असून त्यांचे विद्यार्थी या विभागाची सिग्नेचर ट्यून देखील बनविणार आहेत. याबरोबरच महोत्सवा दरम्यान त्यांच्या संस्थेच्या प्रांगणात अॅनिमेशन या विषयावरील एक कार्याशाळाही आयोजित करण्यात येणार आहे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी देखील पार पाडणार आहेत.
यावेळी बोलताना रवी गुप्ता म्हणाले, ”यंदाच्या महोत्सवास आम्हाला क्लब महिंद्रा, फॉक्सवॅगन गृप इंडिया, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड, युएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेड, स्क्रॅबल एंटरटेन्मेंट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, एफटीआयआय, पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, मॅक्सम्युलर भवन, फिल्म्स् डिव्हिजन आणि व्हिस्लींग वूड्स इंटरनॅशनल यांचे सहकार्य लाभले असून त्यांच्या मदतीनेच आम्ही पुण्यासारख्या शहराचा सांस्कृतिक वारसा केवळ जपतच नाही तर पुढेही चालवीत आहोत.”
याचप्रमाणे महोत्सवासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, डिएचल प्रा. लि., दूरदर्शन, रेडिओ वन, हॉटेल रामी ग्रॅण्ड, तरवडे क्लार्कस् इन, हॉटेल रॉयल्टी, एसएमपीटीई आणि वाहतूक व्यवस्थापक एल. व्ही. शिंदे गृप यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.