नागपूर -जगभरात करोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात येत नसताना भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र तडाखा बसला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनासंदर्भात जनतेला आवाहन केलं आहे. त्यासोबतच, देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटाविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे गाफील झालो. म्हणूनच हे संकट उभं राहिलं. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी”, असं मोहन भागवत म्हणाले. ऑनलाईन व्याख्यान श्रुंखलेमध्ये ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘हम जीतेंगे: पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ या व्याख्यानमालेचा भाग म्हणून शनिवारी संबोधित केले. हा कार्यक्रम कोविड रिस्पॉन्स टीम दिल्ली करत आहे. 11 मे पासून सुरू असलेल्या कार्यक्रमाचा शनिवारी शेवटचा दिवस आहे.

