आपल्या विद्यार्थांच्या कल्पक कामाला प्रेरणा आणि प्रशंसा देण्यासाठी सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (पीआयएटी) ‘ऑरा – २०१७’ या नाविन्यपूर्ण प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत हे प्रदर्शन ‘पीआयएटी’च्या परिसरात झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचे सहाय्यक उपसचिव विजय कोल्हे, प्रसिद्ध अंतर्सजावट छायाचित्रकार आनंद दिवाडकर, ‘सूर्यदत्ता ग्रुप’चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया आणि सौ. सुषमा चोरडिया यांच्या उपस्थितीत झाले.
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून केलेले रचना (डिझाईन) काम, तसेच अंतर्गत सजावटीसाठी आवश्यक असलेली विविध उत्पादने या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. सदनिका, बंगले, कार्यालये, बँका, रेस्टॉरंट्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आदींच्या अंतर्रचनेत उपयुक्त ठरणारे फर्निचर, उत्पादने, आराखडे व संदर्भही आंतरराष्ट्रीय निकषांनुसार प्रदर्शित करण्यात आले. ‘ऑरा’ प्रदर्शनाने पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. आतापर्यंत झालेल्या प्रदर्शनांत जगातील सात आश्चर्ये, एकत्र कुटूंब पद्धती, अजंठा लेणी, रेल्वे स्थानके, गॅरेज, खेड्याकडे चला, आपले पुणे – पुनवडी ते पुण्यनगरी एक प्रवास, अंतराळ विश्व, राजवाडे अशा संकल्पना, तसेच वर्तुळाकार गती, ताल – डिझाईन फ्लो असे विषय हाताळण्यात आले आहेत.
यंदा या प्रदर्शनात ‘टाकाऊपासून टिकाऊ व पुनर्वापर’, तसेच ‘समुद्रातील अंतर्विश्व’ अशी नाविन्यपूर्ण संकल्पना निवडण्यात आली होती. त्यातून ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्रदूषणमुक्त भारत’ हा संदेश, तसेच ते ध्येय गाठण्यासाठीचे प्रयत्न प्रतिबिंबित झाले.
अपयश ही यशाची पहिली पायरी असून यशासाठी अपयशाचा अनुभव घेणेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुरली लाहोटी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. विजय कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम व त्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कचरा व प्रदूषण या जगभरात भेडसावणाऱ्या समस्या असल्याच्या मुद्द्यावर भर देऊन ते म्हणाले, की मानव जातीच्या वाढत्या गरजांकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याच्याअभावी कचरा व्यवस्थापनाची प्रमुख समस्या उभी राहिली आहे. अंतर्रचनेचे महत्त्व व त्याची योग्य अंमलबजावणी यावर आनंद दिवाडकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन’च्या ‘पीआयएटी’ संस्थेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी आज आपल्या व्यवसायात अत्यंत यशस्वी ठरुन कार्यरत आहेत.