पुण्यातील प्रोफाईल कॅन्सर सेंटरचे सल्लागार कर्करोग शल्यविशारद डॉ. सुमित शहा यांना नुकतेच ‘प्रॉमिसिंग सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट ऑफ द इय़र – २०१९ इन इंडिया’ हाराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नवी दिल्लीत झालेल्या सातव्या ग्लोबल हेल्थकेअर एक्सलन्स ॲवॉर्ड्स २०१९ अँड समिट या कार्यक्रमात डॉ. शहा यांना हा पुरस्कार त्यांनी गेली १२ वर्षे ऑन्कॉलॉजी (कर्करोगविज्ञान) क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ; केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री व खासदार अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. शहा यांनी कर्करोग जागृती व तंबाखू व्यसनमुक्ती यावर विस्तृत काम केले असून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत शाळा व महाविद्यालयांत अनेक व्याख्याने दिली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते तंबाखू व्यसनमुक्तीसाठी मोफत बाह्यरुग्ण विभाग चालवत आहेत. ऑन्कॉलॉजी क्षेत्र वृद्धिंगत होत असताना ते अवयव जतन शस्त्रक्रियांमधील नवीन प्रवाहांचा प्रसार करतात, ज्यायोगे कँसर बारा होण्याबरोबर रुग्णांना उत्तम आयुष्य जगाता येते. इतकेच नव्हे तर डॉ. शहा कर्करोगावरील लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियाही करतात ज्या रुग्णांना वेदनामुक्त ठेऊन कमीतकमी व्रण व जलद स्वास्थ्य देतात. गेल्या पाच वर्षांत त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दूरवरच्या भागांतील वंचित क्षेत्रासाठी अनेक मोफत कर्करोग शस्त्रक्रिया केल्या आहेत.
डॉ. शहा यांनी लोकांच्या मनातून कर्करोगाची भीती काढून टाकण्यासाठी, तसेच कर्करोग हा बरा होणारा रोग आहे याची जाणीव करुन देण्यासाठी अलिकडेच पुण्यात प्रोफाईल कॅन्सर सेंटर हे व्यापक कर्करोग रुग्णालय सुरू केले आहे.
कर्करोग हे भारतातील मृत्यूंचे दुसरे प्रमुख कारण आहे. वर्ष २०१८ मध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांची भारतातील संख्या २२.५ लाख होती. दरवर्षी कर्करोगाच्या ११.५ लाख नव्या रुग्णांचे निदान होते व जवळपास ७.८४ लाख मृत्यू कर्करोगाने ओढवतात. या रोगाची मुख्य कारणे तंबाखू, एचपीव्ही इन्फेक्शन, बदलती जीवनशैली व लठ्ठपणा ही आहेत. पाश्चिमात्य जगात कर्करोगाचे बहुतांश रुग्ण बरे होतात, पण दुर्दैवाने भारतात मात्र बहुतांश रुग्ण त्यांचे उपचार या रोगाच्या उशिराच्या टप्प्यात सुरू करतात.
डॉ. शहा म्हणतात, “या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला जागृती करावीच लागेल. मुख्यत्वे लोकांनी त्यांची मानसिकता बदलायला हवी आणि कर्करोग बरा होणारा रोग आहे हे स्वीकारायला हवे. भारतातील सर्वसाधारण कर्करोगांची सर्वसाधारण लक्षणे आपण लक्षात ठेवली तर सुरवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान होऊन उपचारांनी हा रोग बरा करता येऊ शकेल.”
ते पुढे म्हणाले, “स्त्रियांमधील स्तनांचा व गर्भाशयमुखाचा कर्करोग, पुरुषांमधीलतोंडाचा, फुप्फुसाचा व पोटाचा कर्करोग हे भारतातील सर्वसाधारण कर्करोग आहेत. गर्भाशयमुखाचा कर्करोग एचपीव्ही लसी देऊन, तोंडाचा कर्करोग तंबाखू व्यसनमुक्तीतून आणि उर्वरित कर्करोग आरोग्यपूर्ण जीवनशैली पत्करुन व लठ्ठपणा टाळून टाळता येतात. भारतातील हे सर्व साधारण कर्करोग हे प्रतिबंधात्मक कारणांमुळे होतात. वेळेवर कृती आणि जागृती वाढवण्याने देशावरील हे कर्करोगाचे ओझे कमी करता येऊ शकते.”