पुणे : व्यवसाय कोणताही निवडलात तरी त्याच्याशी तन्मय व्हा. दुसऱ्याचा व्यवसाय मोठा आणि आपला मात्र छोटा, असा न्यूनगंड मनाशी बाळगू नका, कारण आपण एखाद्या व्यवसायाचे मालक असणे हीच फार महत्त्वाची गोष्ट असते. कष्ट आणि प्रामाणिकपणाने कार्यरत राहिल्यास प्रत्येक व्यवसाय नक्कीच वाढतो, हे सत्य लक्षात ठेऊन आजच्या तरुणाईने व्यवसायाच्या मार्गाने समृद्धी साधावी, असे आवाहन जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी आज येथे केले. ‘अखिल दातार कुलसंमेलन २०१८’ या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कर्वेनगरमधील प्रतिज्ञा हॉलमध्ये झालेल्या या मेळाव्यात प्रसिद्ध निवेदिका व सूत्रसंचालक मीनल दातार यांनी डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेतली. जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरूडभरारी घेणाऱ्या आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणाऱ्या डॉ. दातार यांनी या मुलाखतीतून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “व्यवसाय हे असे क्षेत्र आहे जेथे प्रत्येकाला संधी मिळते. व्यवसाय करण्यासाठी जात-धर्म-वारसा-शिक्षण-आरक्षण-वशिला या गोष्टी महत्त्वाच्या नसून कष्ट, जिद्द आणि कल्पकता हे गुण गरजेचे असतात. व्यवसाय कुठलाही निवडला आणि कोणत्याही बाजारपेठेत केला तरी तेथे ग्राहकांची गरज पूर्ण करणे, हाच यशाचा मंत्र ठरतो. आज अनेक भारतीय परदेशांत शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी जातात, परंतु व्यवसाय करण्याची जिद्द बाळगून जाणारे संख्येने कमी आढळतात. परदेशात व्यावसायिक संधी खूप आहेत आणि पैसेही जास्त मिळतात, पण तेथील समाजांशी समरसतेने राहणे व स्थानिक कायद्यांचे काटेकोर पालन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. तेथे श्रमाला प्रतिष्ठा असल्याने व्यवसाय लहान अथवा मोठा मानण्यापेक्षा पैसे कमावणे महत्त्वाचे मानतात. आपणही हाच उद्देश ठेऊन जावे. त्यावर कुणी टीका केली तरी त्याकडे लक्ष देऊ नये कारण अखेर आपल्या कुटूंबाचे पोट आपल्यालाच भरायचे असते. ”
व्यवसाय आणि व्यावसायिकाने काळानुसार बदलण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले, “मी दुबईत राहून गेली ३५ वर्षे व्यवसाय केला. त्यातील २५ वर्षे मी अत्यंत साधेपणाने राहिलो, पण माझ्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही मात्र दहा वर्षांपूर्वी मी परिवर्तन संसार का नियम है, या गीतेतील उपदेशाला अनुसरुन माझ्या व्यक्तीमत्त्वासह व्यवसायाच्या रचनेत, शैलीत, तंत्रज्ञानात बदल घडवला आणि त्याचा उत्तम परिणाम दिसून आला. व्यवसायात ब्रँड व्हिजिबिलिटी फार महत्त्वाची असते. जो दिखता है वो बिकता है, हे येथील साधे-सरळ तत्त्व आहे. कालानुरुप शैलीत बदल न घडवणारे किंवा प्रसिद्धीविन्मुख राहणारे व्यावसायिक स्पर्धेत मागे पडतात. तुम्ही असता कसे यापेक्षा दिसता कसे, यामध्ये जगाला रस असतो. म्हणूनच उद्योजकांनी आपला ब्रँड सतत चैतन्यशील आणि गतिमान ठेवला पाहिजे.”
डॉ. दातार यांनी यावेळी स्वतःच्या आयुष्यातील आठवणीत राहिलेले प्रसंग विशद केले. ते म्हणाले, “व्यवसायात पहिल्या वर्षी प्रचंड नुकसान झाल्याने आईचे मंगळसूत्रासहित सर्व दागिने विकण्याची वेळ आमच्यावर आली. ते पुन्हा घडवेपर्यंत भारतात पुन्हा पाऊल न टाकण्याचा निश्चय करुन मी अफाट कष्ट उपसले आणि अखेर तो निर्धार खरा करुन दाखवला. त्यावेळी आईने मायेने व कौतुकाने गालावर फिरवलेला हात हे माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे बक्षीस होते. लहानपणी मला एका पंगतीतून उठवले गेले होते. तो माझ्या गरीबीचा अपमान होता. त्यावेळी मला समजले, की प्रतिष्ठा माणसाला नसून त्याच्याजवळच्या पैशाला असते म्हणूनच तुम्ही असता कसे यापेक्षाही तुम्ही दिसता कसे हे स्वतःला उमगणेही महत्त्वाचे असते.”
या कुलसंमेलनात डॉ. दातार यांच्यासह मुकूंद कुलकर्णी (साखर तंत्रज्ञ), प्रमिला दातार (गायिका), विद्याधर दातार (निवृत्त न्यायाधीश), ॲड. आशा गचके, डॉ. अरुण दातार व डॉ. आरती दातार (शास्त्रज्ञ), डॉ. मुकूंद दातार (पर्यावरण तज्ज्ञ), डॉ. विवेक दातार (डॉक्टर), विलास दातार (सांस्कृतिक क्षेत्र), वैभव दातार (कवी), सृजन दातार (गायक) यांचा सत्कार करण्यात आला. दातार कुलवृत्तांताचे नूतनीकरण, दातार कुलसंमेलनाचे दरवर्षी विविध ठिकाणी आयोजन, वधू-वर मंडळाचा संकल्प, दातार कुलमंडलाची धर्मादाय संस्था म्हणून नोंदणी करणे असे उपक्रम आगामी काळात हाती घेणार असल्याची माहिती या कुलसंमेलनाचे अध्यक्ष मुकूंद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात दिली. कार्यक्रमाला दातार कुलनामाच्या व्यक्ती, तसेच मूळचे दातार परंतु कालौघात आघरकर, आगरकर, फडणीस, वर्तक, सबनीस, कुलकर्णी, दफ्तरवार व चौकर ही उपनामे लावणाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल दातार यांनी केले तर कमोडोर हर्षद दातार यांनी आभार प्रदर्शन केले.