पुणे : ‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पिडिशन 2018’ या गिर्यारोहण मोहिमेचा काल कंपनीच्या आकुर्डी प्रकल्पात ध्वज फडकावून शुभारंभ झाला. फोर्स मोटर्स कंपनीने पाठबळ दिलेल्या या मोहिमेत समुद्रसपाटीपासून ८८४८ मीटरवरील व पृथ्वीवरील सर्वाधिक उंच असलेले एव्हरेस्ट शिखर सर केले जाणार असून त्यात पुण्यातील समीर पाथम व सौराज झिंगन हे गिर्यारोहक सहभागी झाले आहेत.
ही मोहीम एकूण ७० दिवसांची असून त्यासाठी समीर व सौराज ही जोडगोळी येत्या रविवारी (२५ मार्च) पुण्यातून रवाना होणार आहे. पुण्यातून काठमांडूला पोचल्यावर त्यांना ५४३७ मीटर उंचावर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोचण्यास सुमारे दोन आठवडे लागतील आणि तेथून डोंगरात उंच तळ ठोकण्यासाठी तीन आठवडे लागतील. मे महिन्याच्या अखेरीस ते शिखरावर चढाईचा अंतिम प्रयत्न हाती घेतील.
ध्वज फडकावून या मोहिमेचा शुभारंभ करताना या गिर्यारोहकांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न फिरोदिया यांच्या हस्ते बर्फात वापरण्याची कुऱ्हाड (आइस-ॲक्स) भेट देण्यात आली. याप्रसंगी श्री. फिरोदिया म्हणाले, “समीर व सौराजला या मोहिमेसाठी पाठबळ देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. समुद्रसपाटीपासून २९०५० फुटांवर, उणे ४० अंश सेल्शियस तापमानात, ताशी २०० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि वातावरणात केवळ ३३ टक्के प्राणवायू अशा आव्हानात्मक स्थितीत एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणे, ही टिकून राहण्याची आणि जिद्दीची खरी कसोटी असते. आयुष्यभराचा ठेवा ठरेल अशा या कष्टसाध्य प्रयत्नासाठी फोर्स मोटर्समधील आम्हा सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा.”
समीर पाथमने युरोप, आफ्रिका, भारत व नेपाळमधील गिरीशिखरांवर चढाईचा ध्यास घेऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडली आहे, तर सौराज झिंगन हा मानवी साधनसंपत्ती व्यावसायिक (एचआर प्रोफेशनल) व प्रमाणित स्काय डायव्हर असून त्याला सात देशांमधील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याची इच्छा आहे. “प्रत्येक व्यक्ती आपल्यातील स्वतःचे एव्हरेस्ट जिंकण्याची आकांक्षा बाळगते आणि हेच स्वप्न त्यांची ओळख पुनर्स्थापित करते. आमच्यासाठी खरेखुरे एव्हरेस्ट सर करणे हीच आकांक्षा आहे. आम्ही याआधी सन २०१५ व सन २०१७ मध्ये तसा प्रयत्न कसोशीने केला होता, परंतु शिखर गाठण्याच्या अगदी जवळ पोचलो असताना आम्हाला आकस्मिक अडथळ्यांमुळे चढाई मधूनच सोडून द्यावी लागली. आता मात्र हा अंतिम टप्पा साध्य करण्याचा निर्धार पूर्ण करण्याची संधी आम्हाला फोर्स मोटर्सने मिळवून दिली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत”, अशी प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली आहे.
सन २०१५ मध्ये ही जोडगोळी अशाच एव्हरेस्ट मोहिमेवर असताना नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला आणि त्यामुळे माऊंट एव्हरेस्टवर हिमकडे कोसळू लागले. या स्थितीत समीर व सौराज यांनी माणुसकीच्या कर्तव्याला महत्त्व देत स्वतःची मोहिम स्थगित केली आणि भूकंपाचे धक्के आणि हिमकडे कोसळण्यातून अन्य गिर्यारोहकांची धाडसाने सुटका करण्याच्या मदत कार्यात ते सक्रिय राहिले.
सन २०१७ मधील प्रयत्नात ते दोघे ८००० मीटर उंचीवर पोचले, परंतु खराब हवामानामुळे त्यांना परत फिरावे लागले. या खेपेसही सर्व संघाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी स्वतःची आकांक्षा बाजूला ठेवली आणि पुढील वर्षी चढाईचा पुन्हा प्रयत्न करण्याची आशा बाळगून सर्व सदस्यांसह सुरक्षित परत आले.
सौराज व समीरला शुभेच्छा, तसेच प्रोत्साहन देण्यासाठी आणि या मोहिमेच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी फेसबुकवरील फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पिडिशन 2018 या पानाशी जोडून घेण्याचे आवाहन यानिमित्त करण्यात आले आहे.