पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘सूर्य मीलन – ग्रँड ॲल्युम्नी मीट २०१७’ हा महामेळावा नुकताच संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या महोत्सवाने माजी विद्यार्थ्यांतील सहकार्य समृद्ध करत त्यांच्यात भक्कम भावबंध विणले. ‘सूर्य मीलन’ या वार्षिक उपक्रमाचे हे १८ वे वर्ष होते. या महोत्सवात शिक्षकांबरोबरच ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’चे ३०० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. काहीजण तर पत्नी व मुलांसमवेत मेळाव्यासाठी आले होते.
‘सूर्यदत्ता’चे माजी विद्यार्थी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करत आहेत. त्यामध्ये इन्फोसिस, नेस्ले इंडिया, व्होडाफोन, डॉइश बँक, फुजित्सू कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ईक्लर्क्स, श्रीराम जनरल इन्शुरन्स, बँक ऑफ न्यू यॉर्क मेलॉन, एअरटेल, मर्स्क लाईन, कोटक महिंद्र बँक, ॲक्सिस बँक, फेरेरो इंडिया, सन गार्ड, फिलिप्स लायटिंग इंडिया लिमिटेड, टाइम्स ऑफ इंडिया, ॲक्सेंच्युअर सॉफ्टवेअर, जस्ट डायल, क्रेडिट स्विस, बर्जर, कॅप्स्टन, रेनॉल्ड इन्फोटेक, झी मीडिया कॉर्पोरेशन, एक्साईड इंडस्ट्रीज आदि नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. काही विद्यार्थी उद्योजक बनले असून त्यांच्या कंपन्यांत पियूष्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, फिटनेस ट्रेनर, ऑटो कॉप, चौधरी डेव्हलपर्स, कोचिंग इन्स्टिट्यूट्स आदींचा समावेश आहे.
मेळाव्यात बोलताना ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “आमचे २२०००हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क असून हे विद्यार्थी भारताच्या विविध भागांत, तर काहीजण परदेशांतही कार्यरत आहेत. माजी विद्यार्थी हे संस्थेचे ब्रँड ॲम्बॅसेडर असून त्यांचे कंपनी जगतातील कार्यच संस्थेविषयी सविस्तर समजण्याइतके पुरेसे बोलके आहे.” प्रा. डॉ. चोरडिया यांनी आयुष्यात यशस्वी कसे व्हावे, याचे कानमंत्र विद्यार्थ्यांना दिले. उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी सुस्पष्ट ध्येय-दृष्टीकोन असावा आणि सातत्यपूर्ण कृती करावी, ज्यायोगे विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. जीवनात उद्दिष्ट्य बाळगणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येकाने पहिले ध्येय गाठून दुसऱ्या ध्येयाकडे वाटचाल करताना गुणवत्तेची पातळी उंचवावीच, असे सांगून त्यांनी निष्ठेच्या चलनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली, तसेच झपाट्याने विस्तारणाऱ्या जगात स्पर्धात्मक राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानांचा अंगीकार करावा, यावरही त्यांनी भाषणात भर दिला.
डॉ. चोरडिया यांनी माजी विद्यार्थ्यांना दरवर्षी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या सूर्यदत्ता स्थापना दिनाला, ५ सप्टेंबरला होणाऱ्या शिक्षक दिनाला व डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.
माजी विद्यार्थी पुष्कर लिंघारकर याने आपण ‘सूर्यदत्ता’मधील रम्य विद्यार्थी जीवनाला मुकल्याचा भावनात्मक अनुभव सांगितला आणि या संस्थेत आयोजित विविध कार्यक्रमातून आत्मविश्वास कसा मिळाला, हेही विशद केले. त्याने ‘सूर्यदत्ता’चे वर्णन एका वाक्यात ‘घरापासून दूरचे दुसरे घर’ असे केले.
काही माजी विद्यार्थ्यांनी आपण जीवनात जे काही मिळवले आहे, ती ‘सूर्यदत्ता’ची देणगी असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी एकमताने कबूल केले, की त्यांचा कल्याणकारी विकास हा ‘सूर्यदत्ता’ने पुरवलेल्या साचातूनच शक्य झाला. हा मेळावा असे व्यासपीठ ठरला, जेथे दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दक्षिण भारत-उत्तर भारत, महाराष्ट्र आणि देशभरातील विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळातील क्षणांना उजाळा दिला.
‘सूर्यदत्ता’चे माजी विद्यार्थी ‘सूर्यन्स’ नावाने ओळखले जातात. ते आठवड्याला अथवा महिन्याला किमान दोन तास वेळ नव्या, तसेच सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आणि आपला कामाचा अनुभव विशद करण्यासाठी देणार आहेत. या ‘सूर्यन्स’ना त्यासाठी मानधन व प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे प्रा. संजय चोरडिया यांनी सांगितले. या उपक्रमाचा उद्देश माजी विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन क्षेत्राविषयी रस निर्माण करणे व प्रशिक्षित उद्योग अनुभवी व्यक्तींद्वारे शिक्षण क्षेत्राची गरज भागवणे, हा आहे.
संस्थेचे शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सौ. सुषमा चोरडिया, तसेच ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या कर्मचारी वर्गाने या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांसमवेत केक कापला. मेळाव्याचा समारोप डीजे रजनी व भोजनाने झाला.

