पुणे : आपल्या कलेत उच्च विद्वता प्राप्त केली तरी शिष्य हा गुरूसमोर लहानच असतो. गुरू हा अथांग
सागराप्रमाणे असतो. शिष्याने मात्र रिक्त ओंजळीने गुरूसमोर शरण जावे लागते. स्वत:ला सर्वज्ञानी समजणारा शिष्य
कधीच मोठा कलावंत होऊ शकत नाही. म्हणूनच शिष्याने कायम साधकाच्या भूमिकेत रहावे, अशी भावना प्रसिद्ध
गायक पं. शौनक अभिषेकी, प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद आणि प्रसिद्ध नृत्यांगना निलिमा अध्ये
यांनी व्यक्त केली. निमित्त होते उद्गारतर्फे झालेल्या प्रतिबिंब मैफलीचे.
रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ डगर चलत या संकल्पनेतंर्गत प्रतिबिंब मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
शब्द मैफल आणि एकल सादरीकरण अशा दोन सत्रात झालेल्या या मैफलीने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले. गुरू-
शिष्य परंपरा उलगडणाऱ्या या कार्यक्रमास अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे यांची
विशेष उपस्थिती लाभली.
संस्थेच्या अध्यक्षा आसावरी पाटणकर यांनी सादर केलेल्या वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अनौपचारिक
गप्पांमधून पाटणकर यांनी पं. शौनक अभिषेकी, पं. अरविंदकुमार आजाद तसेच निलिमा अध्ये यांच्याशी मुक्त संवाद
साधला. यावेळी अभिषेकी म्हणाले, “ माझे वडील स्वत: मोठे गायक असले तरी त्यांनी गायनाचा पाया पक्का
करण्यासाठी मला कमलताई तांबे यांच्याकडे शिकण्यास पाठविले. माझ्या गळ्यात सूर आहे याची खात्री त्यांना
पटल्यावर वडील हेच माझे गुरु झाले. त्यानंतर मात्र, आमच्यातील वडील-मुलगा हे नातं बाजूला होऊन गुरु-शिष्य हेच
नाते शेवटपर्यंत राहिले. त्यांनी काय दिले हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे परंतु, मला त्यांचा शिष्य होण्याची
संधी लाभली हेच माझ भाग्य समजतो.”
तबल्यानी मला पसंत केले की मी तबल्याला हे सांगणे अवघड आहे असे सांगत आजाद म्हणाले की, वादनाचे
संस्कार आमच्या घरातूनच झाले. बनारसमध्ये आपल्या घराबरोबरच दुसऱ्या घरी जाऊन कलेचे शिक्षण घेण्याची
परंपरा आहे. त्यामुळेच माझे वडील स्वत: उत्कृष्ठ तबलावादकं असल्याने त्यांच्याबरोबरच पं. जगदिश शंकर मिश्रा
यांच्याकडे तबला वादनाचे प्राथमिक धडे घेतले. नंतर पं. किशन महाराज यांच्याकडे शिकण्याचा योग आला. तो सर्व
अनुभव खरोखरच विलक्षण होता. त्यांचा सहवासच खूप काही शिकवून गेला. त्याच्या सानिध्यात राहून कलेकडे
बघण्याची दृष्टीच बदलून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गुरु रोहिणीताई भाटे यांच्याबद्दल सांगताना काहीशा भावूक झालेल्या नीलिमा अध्ये यांनी त्यांच्या आणि बेबीताई
(रोहिणी भाटे) यांच्यातील नात्यातील गुंफण उलगडली. त्या म्हणाल्या, “नृत्याबरोबरच साहित्य, संगीत या कलेतही
रोहिणीताई यांना विशेष रुची होती त्यामुळेच त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीतून परिपूर्णतेचे दर्शन घडायचे. एक
शिष्य म्हणून त्यांच्या सहवासातील माझा प्रत्येक क्षण सत्कारणी लागला. प्रत्येक भेटीतून आपली नव्याने जडणघडण
होत असल्याचा अनुभव घेण्याची सुसंधी मला मिळाली. याचे कोणत्याच पारड्यात मोजमाप होऊ शकत नाही.”
या मैफलीच्या दुसरया सत्रात सहभागी कलाकारांनी एकल सादरीकरणातून आपल्या गुरूंकडून अवगत केलेली विशेष
कलाकृती सादर केली. या अनोख्या मैफलीस रसिक पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गायन, वादन आणि
नृत्याचा त्रिवेणी अविष्कार रसिकांना मैफलीतून अनुभवता आला.

