पुणे-स्वतःच्या अधिकारासाठी रस्त्यावर यावे लागते, याला हेच सर्व लोक कारणीभूत आहेत. लोकसंख्येनुसार आरक्षण देऊन टाकायला हवे. सोयीच्या राजकारणामुळे आजवर बळी गेले त्यांना कोण कारणीभूत आहे, असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.
मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या समन्वयकांची बैठक बोलावली होती. परिषदेला आलेल्या लोकांनी वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत, आंदोलनाच्या पुढील दिशा काय असावी, याबाबत यावेळी चर्चा झाली.
आरक्षणावर एवढी चर्चा का केली जाते हे कळत नाही. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तीस वर्षे झाली अजून किती वाट बघायची, असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी केला.
इतर जातींना जसा न्याय दिला तीच अपेक्षा मराठा, मुस्लिम, धनगर समाजाची आहे. स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवला तर केसेस केल्या जातात. अजून किती अंत बघणे योग्य नाही. ही पक्षविरहित बैठक होती. कारण नसताना न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जागतिक पातळीवरील संयम पुरस्कार द्यायचा झाला तर या समजलाच द्यावा लागेल .लवकर निर्णय घ्या नाही तर उद्रेक होऊ शकतो ..असा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल …असा हि प्रश्न त्यांनी केला .

