ओतूरला यात्रा नियोजन बैठक संपन्न
ओतूर – ओतूर (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवारी भरणाऱ्या यात्रेची तयारी पुर्ण झाली असुन यात्रा नियोजनाची बैठक ओतूर येथे नुकतीच पार पडली असल्याची माहिती श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव वसंत पानसरे यांनी बोलताना दिली.
येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यात भरते.श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार होणाऱ्या तांदळाच्या कलात्मक पिंडी पहाण्यासाठी व दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक हर.. हर.. महादेवचा जयघोष करत ओतूरमध्ये दाखल होतात.श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी श्री कपर्दिकेश्वर मंदिरात तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येतात.येथील दैवत हे भक्तांना नवसाला पावत असुन भक्तांच्या मनोकामना पुर्ण होतात अशी भावना येथील भाविकांची आहे.
श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्था व समस्त ग्रामस्थ ओतूर यांच्यावतीने विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त दि.१३ अॉगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त सकाळी आठ ते अकरा शालेय विद्यार्थ्यांंच्या दिंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.१९ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाल,महिला,वारकरी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, दुसरा श्रावणी सोमवार दि.२० रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.तिसरा श्रावणी सोमवार दि.२७ व दि.३ सप्टेबर रोजी चौथा श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे.तसेच मंगळवार दि.४ सप्टेबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिळा हंगामा व ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराला रूद्राभिषेक करून यात्रेची सांगता होणार आहे.