पुणे : मराठमोळा पेहराव करून महानगरपालिकेच्या प्रांगणात जमलेल्या महिला शाहिरा… छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या मातृशक्ती जिजामाता यांना केलेले नमन… निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा…या शब्दात बुलंद आवाजातील पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना महिला शाहिरांनी मानवंदना दिली.
महिला व बालकल्याण समिती पुणे महानगरपालिका आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधिनीच्या महिला शाहिरांनी पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. पुणे महानगरपालिका भवनाच्या प्रांगणात नवीन बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, महिला व बाल कल्याण समिती पुणे महानगरपालिकेच्या रुपाली धाडवे, प्रबोधिनीचे अरुणकुमार बाभुळगावकर आदी उपस्थित होते. अक्षदा इनामदार, श्रद्धा जाधव, आदिती कालेकर, तृप्ती उफाळे, कृष्णा उफाळे, सानवी कुटे यांनी पोवाडा सादरीकरण केले.साहिल पुंडलिक यांनी हार्मोनियम, होनराज मावळे यांनी ढोलकी आणि शिवम उभे यांनी तालवाद्याची साथसंगत केली.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पुणे महानगरपालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण झाले. महाराजांना मानवंदना देण्यासाठी व महिलादिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

