पुणे-मेफेड्राॅन या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने वानवडी भागात पकडले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगेंनी शुक्रवारी दिली. आराेपींकडून दीड लाख रुपयांचे 10 ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, दुचाकी असा तीन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मतीन हुसेन मेमन (वय 21, रा. सबेरा पार्क, कोंढवा,पुणे), शाहरुख कादीर खान (वय 29, रा. युनिटी पार्क, कोंढवा,पुणे), अनमोलसिंग मनचंदा सिंग (वय 33, रा. साईद्वारका सोसायटी, एनआयबीएम रस्ता, काेंढवा,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक- एक गस्त घालत होते. त्यावेळी वानवडी भागात लुल्लानगर परिसरात दोन तस्कर अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मतीन मेमन,शाहरुख खान यास पकडले. त्याच्याकडील सखाेल पोलिस चौकशीत साथीदार सिंग याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर अनमाेलसिंग याचेकडून दाेघांनी मेफेड्राॅन विक्रीस आणल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल
आरोपी मेमन, खान, सिंग शहरात अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.याप्रकरणी आराेपींवर वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीसी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी नेमके सदर अमली पदार्थाची विक्री कोणास करणार होते ,त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत, अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट नेमके कोण चालवतोय याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पाेकळे, गुन्हे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के यांनी ही कारवाई केली आहे

