पुणे- महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी कायमस्वरूपी व्यवस्था नाही,खासगी टँकरने होणारा पाणीपुरवठा, कचरा संकलन करण्यासाठी अपुरी व्यवस्था, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब झालेले रस्ते, नागरिकांना आरोग्य विषयक मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत अशी या समाविष्ट गावांची परिस्थिती आहे.या परिसरातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने त्वरित महापालिकेला १० हजार कोटींचा निधी द्यावा अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार सौ.वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, दिपक मानकर,सौ.दिपाली धुमाळ,अश्विनी कदम,अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर,महेंद्र पठारे, निलेश निकम,प्रदीप गायकवाड,काकासाहेब चव्हाण,श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आयटी व इतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांनी या समाविष्ट गावांमधील सोसायटीमध्ये आपल्या सदनिका घेतल्या असून या सर्व नागरिकांना सोयी सुविधा देण्यास पुणे महानगरपालिकेची सध्याची यंत्रणा कमी पडत आहे.या समाविष्ट गावांमध्ये दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारणे,नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे,एसटीपी प्लॅन्ट उभे करणे, पाणीपुरवठा योजना सुरू करणे, नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे , ही कामे तातडीने होणे गरजेचे आहेत. या समाविष्ट गावांमधील नागरिकांना या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात या हेतूने राज्य सरकारकडे १० हजार कोटींची मागणी करण्यात यावी,
त्याचप्रमाणे पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे अपघात होत असून हे खड्डे दुरुस्त करण्यात यावे , पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दर आठवड्यात किमान एक दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो ही परिस्थिती सुधारून 365 दिवस नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी देण्यात यावे, शहरात ठीक ठिकाणी दिसणारा कचरा राडाराडा याची विल्हेवाट लावत शहर स्वच्छ करणे, शहरातील मोकाट जनावरे कुत्री यांचा बंदोबस्त करणे, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या बिना वापर पडून आहेत या टाक्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन त्या वापरात आणणे व नागरिकांना नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करणे या मागणी देखील यावेळी करण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “पुणे शहरातील समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सदर निधी मिळणे अत्यंत गरजेचे असून याबाबत महाराष्ट्र आदरणीय विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहे. समाविष्ट गावांमध्ये सोयी सुविधा मिळाव्या हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका असून या गावांमध्ये सोयी सुविधा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

