मुंबई-विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विधानसभा सभागृहात भाजप-शिंदे गटाने बहुमत चाचणीही जिंकली. बहुमताच्या बाजूने सरकारला 164 मते मिळवली. तर विरोधात मविआकडून केवळ 99 जणांनी मते दिली.
काल ठाकरेंसाठी ढसाढसा रडले, आता एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले
दरम्यान, बहुमताच्या चाचणीपुर्वीच आज उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गटासोबत बसमधून ते विधानभवनात दाखल झाले. संतोष बांगर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या 40वर गेली आहे. बंडखोर आमदार येतील तेव्हा सोडू नका. त्यांचं स्वागत सडके टमाटे आणि अंडे फेकून करा, त्यांना सोडून नका. बंडखोरी केल्याने त्यांचं तोंड आधीच काळं झालं आहे, अशी भाषणं दरम्यानच्या काळात संतोष बांगर यांनी केली होती.विशेष म्हणजे संतोष बांगर यांनी कालच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मविआ उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज अचानक त्यांनी आपली बाजू बदलली आहे. दुसरीकडे, बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेकडूनही प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे व्हीपवरुन आजही शिंदे गट व शिवसेनेमध्ये संघर्ष पाहण्यास मिळत आहे.