खासदार बापट , आमदार शिरोळे,काही नगरसेवक पाण्यासाठी धडकले आयुक्ताच्या बंगल्यावर/पण प्रेमाने …
पुणे- आयुक्त विक्रम कुमार यांना बाकीचे प्रेशर जास्ती आहे पण त्यांच्या घरी पाण्याचे प्रेशर देखील बर्यापैकी आहे असे विधान आज खासदार गिरीश बापट यांनी केलं , आज बापट यांनी भाजपाच्या विविध मान्यवर कार्यकर्त्यांसह आयुक्तांच्या बंगल्यावर काल बोलल्या प्रमाणे धडक दिली . पाणी वाटपात भेदभाव , दुजाभाव हा त्यांचा मुख्य आरोप होता ,त्यासाठी त्यांनी कालवा समितीतून ४० वर्षात पहिल्यांदाच सभात्याग हि केला होता . बापटांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपा सह राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या आणि महापालिकेत भेदभाव लॉबी चालविणाऱ्यांच्या काळजात धस्स झाले होते.
काल सभात्याग करून दिलेल्या वेळेप्रमाणे खासदार बापट आज आयुक्तांच्या बनल्यावर धडकले , आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, उज्ज्वल केसकर, स्वरदा बापट, सुनील माने,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. बाहेरच त्यांनी आपल्या समवेत आलेल्या कार्यकर्त्यांना हा मोर्चा नाही कि आंदोलन नाही त्यामुळे घोषणा कोणी देऊ नका , आमदार हे बागेतील नळाचे पाण्याचे प्रेशर तपासतील बाकी मी पाहतो , फक्त नगरसेवक आणि मुख्य कार्यकर्ते व काही माध्यम प्रतिनिधी आत बरोबर चला असे सांगत त्यांनी आयुक्तांच्या बंगल्यात प्रवेश केला .काही वेळानंतर ते सारे बाहेर आले तेव्हा आयुक्त विक्रम कुमार माध्यमांसमोर आले नाहीत मधूनच माघारी गेले आणि खासदार बापट यांनी माध्यमांशी संवाद साधला .
पुण्यातील पाणीपुरवठा यंत्रणेतील वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींमुळे शहराच्या विविध भागात कमी दाबाने ,अल्प वेळ होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या दोन-चार दिवसांत मार्गी लागेल असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.बापट म्हणाले, आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या पाच विभागांसाठी तंत्रज्ञांचा समावेश असणारी समिती उद्या नियुक्त केली जाईल. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांवर जबाबदारी टाकण्यात येईल. पाणीपुरवठ्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात येईल.बापट पुढे म्हणाले, तांत्रिक बाबींमुळे काही भागात कमी आणि कमी वेळा पाणी येते. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. शहरात समान पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व माजी नगरसेवकांना आपआपल्या भागात पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही त्या ठिकाणी मी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहे. योजनेच्या प्रगतीचा अहवाल मागवला आहे.

