हजारो दिवे, अभ्यासपूर्ण निवेदन, नकाशे व चित्रपट दृश्यांचा वापर करून उलगडणार शिवरायांची शौर्यगाथाइतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने दृकश्राव्य माध्यमातून युद्धकथा
पुणे : इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने ४० फूट भव्य प्रतिकृती साकारत कांचनबारी लढाईचा इतिहास दृकश्राव्य माध्यमातून सांगण्यात येणार आहे. हजारो दिव्यातून उलगडत जाणारी युद्ध कथा, अभ्यासपूर्ण प्रभावी निवेदन, नकाशे व चित्रपट दृश्यांचा वापर करत कांचन बारीची लढाई जिवंत केली जाणार आहे. मंगळवार दिनांक २५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान सकाळी १० ते रात्री ११ वाजता नवीन मराठी शाळेत ही दृकश्राव्य युद्ध कथा पाहता येणार आहे, अशी माहिती इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी निवृत्त कर्नल निर्मलकुमार, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागीरदार उपस्थित राहणार आहेत.
मोहन शेटे म्हणाले, सन १६७० च्या ऐन दिवाळीत शिवाजी महाराजांनी सूरतेवर छापा टाकून प्रचंड लूट मिळवली. ही अनमोल संपत्ती घेऊन ते स्वराज्यात परत येत असताना त्यांची मोगल सेनापती दाऊदखान कुरेशी याच्याशी गाठ पडली. वणी दिंडोरी जवळच्या कांचन गडाच्या पायथ्याशी हे भयंकर युद्ध झाले. स्वतः शिवाजी महाराज दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन लढत होते.
मोकळ्या मैदानात झालेल्या या लढाईत शिवाजी महाराजांनी ‘वृकयुद्ध’ या डावपेचाचा वापर करत विजयश्री खेचून आणली. सातमाळ डोंगररांगेच्या भौगोलिक परिसराचा चातुर्याने वापर करत गनिमाची कोंडी केली. मोगलांचा पराभव करून राजे सर्व संपत्तीसह राजगडावर सुखरूप पोचले. इतिहासातील ही कथा अनेकांना अपरिचित आहे.

