पुणे – राज्यातील विविध शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावे कर्ज आणि दुचाकी घेउन फसवणूक करणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केले आहे. टोळीकडून 30 लाख रूपये किंमतीच्या 28 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट प्रकरण करून दुचाकी लाटल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
किरणकुमार शशिकांत पेडणेकर (वय 34, रा. नायगाव, वसई) अनिल नामदेवराव नवथळे (वय 31, रा. अकोला) , प्रवीण विजय खडकबाण (वय 39, रा. नायगाव, मुंबई), देवेंद्रकुमार केशव मांझी (वय 50, रा. पालघर, मुंबई), भूषण राजेंद्र सुर्वे (वय 32, रा.धुळे), सुरेश हरिश्चंद्र मोरे (वय 41, रा. ठाणे), पंकजकुमार राजेंद्रप्रसाद सिंह (वय 30, रा. ठाणे, मूळ-वापी, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी प्रीतेश सुभाष शिंदे (रा. ठाणे, मूळ- उब्रज सातारा) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी प्रीतेश कामानिमित्त पुण्यात आले असताना, त्यांना एका बॅंकेचे कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला. मात्र, त्यांनी कर्जासाठी अर्ज केला नसल्यामुळे त्यांनी बॅंकेत फोन केला. त्यानंतर ते बॅंकेत गेले असता, त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड देउन दुचाकी बुक केली होती.
त्याला बनावट धनादेशही जोडण्यात आला होता. त्यानुसार प्रीतेश यांनी सहकानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शोरूममधून दुचाकी घेण्यासाठी आलेल्या किरणकुमारला ताब्यात घेतले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, बापू खेंगरे, पोलीस हवालदार बापु खुटवड, विजय मोरे, संदीप जाधव, पोलीस नाईक भुजंग इंगळे, संदीप ननवरे, सतिष चव्हाण, प्रकाश मरगजे, पोलीस शिपाई किसन चव्हाण, प्रदिप बेडिस्कर, शिवलाल शिंदे यांनी केली.

