धनुष्यबाण हा शिवसेनेचाच:आमदार जाऊ शकतो, मात्र पक्ष जाऊ शकत नाही-उद्धव ठाकरे

Date:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘जे अडीच वर्षापूर्वी सन्मानाने झालं असतं ते असं घातपाताने का केलं’, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेतून ‘धनुष्याबाणाविषयी कोणताही संभ्रम तुम्ही ठेवू नका. धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे आणि शिवसेनेकडेच राहील. हे घटनातज्ज्ञांशी बोलून सांगतो आहे’, असं स्पष्ट केलं.मातोश्री इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

आमदार जाऊ शकतो, मात्र पक्ष जाऊ शकत नाही!

शिवसेना कुणाची हा प्रश्नच येत नाही. कुणी चोरून नेईल अशी शिवसेना नाही. एकेकाळी आमचा एक एकच आमदार होता. ते निघून गेले असते, तर पक्ष संपतो का? आमदार जाऊ शकतो मात्र पक्ष जाऊ शकत नाही. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेला सांगतो की त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका मी स्पष्ट करतो की, विधिमंडळ पक्ष आणि रजिस्टर पक्ष हा वेगळा असतो. त्यात असंख्य मतदार आले, नागरिक आले, पदाधिकारी आले. त्यांना सगळ्यांना पैशाची आमिष किंवा दमदाट्या करून नेऊ शकत नाही. त्यामुळे कितीही दबाव असला तरी जे माझ्यासोबत थांबले त्यांचं मी कौतुक करतो असंही ते म्हणाले.

शिवसेनेला कुणीही, काहीही धोका पोहचवू शकत नाही!

शिवसेनेनं आजपर्यंत कुणाची पार्श्वभूमी काय आहे, राजकीय आहे की नाही याचा विचार न करता साधी माणसं मोठी केली. तो अभिमान मला आजही आहे. ज्यांनी या लोकांना मोठं केलं, जी माणसं मोठी झाली ती गेली. पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिंमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत. ही साधी माणसं जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुणीही, काहीही धोका पोहचवू शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘अडीच वर्षापूर्वी भाजपने घात केल्यामुळे महाविकास आघाडीचा जन्म झाला. आज जे काही त्यांनी घडवलं आहे ते त्यांनी अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत. ते फुकटात झालं असतं. जी गोष्ट सन्मानाने झाली असती तरी घातपाताने का केली. व जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती ती एवढा खर्च करून त्रास घेऊन का केली. हे असे खेळ करत बसण्यापेक्षा निवडणूका घ्या. विधानसभेच्या निवडणूका व्हायला हव्या. जर आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काही बंडखोर आमदारांनी मातोश्रीने सन्मानाने बोलवलं तर भाजपशी चर्चा केली तर नक्की परत जाऊ, आमचं उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे अशी वक्तव्यं केली होती. त्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले ‘सुरतेला जाण्यापेक्षा मला सुरत दाखवली असती तर एवढे पर्यटन घडलेच नसते. काही लोकं जी आतापर्यंत गप्प होती ती आता तिथे जाऊन बोलती झाली आहेत. या लोकांना मातोश्रीबद्दल प्रेम आहे. उद्धव ठाकरे आदित्यबद्दल प्रेम आहे असे ते सांगतात. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आहे. धन्य झालो मी ते ऐकून. जे प्रेम तुम्ही आता दाखवताय. पण गेली अडीच वर्ष जी लोकं मातोश्रीबद्दल, माझ्याबद्दल, माझ्या घराण्याबद्दल, आदित्यबद्दल अश्लाघ्य व विकृत भाषेत टीका करत होते. त्यावेळी का यापैकी कुणाची दातखिळी उचकटली नव्हती. यांच्यातील एकानेही त्यांना विरोध होईल असं बोलला नव्हता. ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आहात, त्यांना भेटता आहात, मिठ्या मारता आहात. मग हे प्रेम तुमचं खरं आहे की तकलादू आहे? ज्यांनी ठाकरे कुटुंबीयांचा अपमान केला, हिणवलं, माझ्या मुलांना आयुष्यातून उठविण्या पर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले होते. अशा लोकांसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात तर हे प्रेम खरं की खोटं हे देखील जनतेला कळू द्या. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही. त्यामुळे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न आहेत. मात्र जनतेला एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. एवढं सगळं देऊन सुद्धा असं का वागलात?

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...