राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमात एकात्मिक उपचार पद्धतीचा वापर व्हावा
केंद्रीय आर्युविज्ञान संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ.के.एस.धीमान यांचे प्रतिपादन
पुणे : आज जगभरात एकात्मिक औषधोपचार पद्धतीला मागणी आहे. आधुनिक ज्ञानासोबतच आयुर्वेदिक ज्ञानाचा उपयोग करुन परिपूर्ण स्वास्थ्य देण्याकरीता उपचार व्हायला हवेत. भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमांमध्ये आयुर्वेदाचे नेत्रतज्ज्ञ तसेच नाक, कान आणि घसा चिकित्सकांचे सहकार्य घेऊन भारतीयांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. यामाध्यमातून आपण एकात्मिक औषधोपचार पद्धतीमध्ये जगात सर्वोत्तम ठरु शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय आर्युविज्ञान संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ.के.एस.धीमान यांनी केले.
द असोसिएशन आॅफ शलाकी (टीएएस) महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे महाराष्ट्रातील आयुर्वेदातील नेत्रतज्ज्ञ, कान, नाक आणि घसा तज्ज्ञांची सिनर्जी २०१६ ही १५ वी राज्यस्तरीय परिषद बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. द असोसिशन आॅफ शलाकीचे मानद संस्थापक डॉ.दिलीप पुराणिक, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र युनिर्व्हसिटी आॅफ हेल्थ सायन्सेसचे आयुर्वेद विभागाचे डीन डॉ.सतिश डुंबरे, शलाकीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.संगीता साळवी, परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश पवार, समन्वयक डॉ.अभिजीत आग्रे, सचिव डॉ.राजेंद्र लाहोरे, डॉ.संतोष मुंडे, डॉ.पारस शहा आदी उपस्थित होते.
डॉ.आशुतोष गुप्ता म्हणाले, योग आणि आयुर्वेद शास्त्राच्या विकासाकरीता ही परिषद महत्त्वाची आहे. केवळ संशोधनच नाही, तर चिकित्सकाला येणा-या समस्यांवर परिषदेत चर्चा करण्यात आली. तसेच नेत्रविकार व कान, नाक, घसा याविषयासंबंधी डॉक्टरांचा दृष्टीकोन, तपासणीकरीता आवश्यक गोष्टी, नवे तंत्रज्ञान, रुग्ण आणि व्यवसायाशी निगडीत असलेल्या कायदेविषयक बाबी अशा विविध विषयांवर व्याख्याने व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.राजेश पवार म्हणाले, आधुनिक औषधोपचार पद्धती एका मर्यादेपर्यंतच रुग्णांवर उपचार करु शकते. रुग्णांना येणारे अंधत्त्व, बहिरेपण हे थांबविण्यासाठी या पद्धतीत मर्यादा आहेत. परंतु आयुर्वेद आणि आधुनिक औषशास्त्राच्या समन्वयातून योग्य उपचाराने या व्याधी दूर करता येतील. अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती, विविध विषयांतील सुरु असलेले संशोधन आणि कायदेशीर मार्गाने वैद्यकीय मार्गदर्शन करणे हा परिषदेचा मुख्य उद््देश होता, असेही त्यांनी सांगितले.
परिषदेच्या निमित्ताने निदानासाठी लागणारी विविध उपकरणे, सर्जनसाठी लागणारी विविध शस्त्रे आणि सामाजोपयोगी आरोग्यविषयक उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच विविध वैद्यकीय विषयांवरील संशोधनपर निबंध पोस्टरच्या माध्यमातून सादर करण्यात आले. परिषदेला राज्यभरातून ३९० डॉक्टर उपस्थित होते.