पावसाळ्याच्या तोंडावर दक्षिण पुण्यातील नागरिक भयभीत;
सिमा भिंतीची कामे, ओढा खोलीकरण, राडारोडा उचलणे, परिसरातील स्वच्छता असे अनेक विषय ऐरणीवर…
पुणे, दि. ४ जून: गेल्या वर्षीच्या आंबिलओढा परिसरातील पुराच्या आठवणी ताज्या असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अजून ढिम्मच असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने सफाईचे काम हाती घेण्यात आले होते. परंतू नाल्यामध्ये काही ठिकाणी गाळ होता. येत्या एक-दोन दिवसात येणा-या पावसाच्या पार्श्वभूमीवर तर हा गाळ तातडीने हलविणे शक्यच होणार नाही. कामाचा वेग पाहता हा गाळ काढण्यासाठी प्रशासनाला किमान आणखी दोन आठवड्यांचा वेळ लागण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता दाखवून गाळ काढण्याबरोबरच अनधिकृत बांधकामे हटवावीत अशी मागणी माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत यांनी केली.
आंबिल ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे गेल्या दोन वर्षापासून आहे तशीच आहेत. सिमाभिंतींची काही ठिकाणी कामे झालीच नाहीत, परिणामी नव्याने बांधण्यात येणा-या भिंती पावसाच्या पाण्याच्या प्रवाहापुढे तग धरतील का? असा सवाल घरत यांनी केला आहे. पावसाच्या तोंडावर धीम्या गतीने नालेसफाई सुरु आहे. पावळ्यात शेवटच्या क्षणात महापालिका अशी कोणती जादूची कांडी फिरवणार त्यामुळे नागरिकांना आणि त्यांच्या घर आणि वस्तूंना वाचवता येणार? सद्यस्थितीला तरी प्रशासन पुण्यात येणा-या पुरावर ठोस उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.
गेल्यावर्षी एका रात्रीच्या तुफान पावसाने कहर आणला आणि पुण्याच्या दक्षिण भागात अक्षरशः पूरच आला होता. त्यात विविध भागांत 13 जणांना जीव गमवावा लागला अन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. पावसामुळे झालेल्या जिवीत आणि वित्तहानीने पुणे पहिल्यांदाच सुन्न झाले होते.
पावसाचे रौद्र रूप बघून नागरिकांना धडकीच भरली होती. आंबिलओढा वसाहत, दांडेकर पूल, मित्र मंडळ चौक, जेधे चौक, अरण्येश्वर, पर्वती दर्शन, मार्केटयार्ड, पद्मावतीचा स्वामी विवेकानंद चौक या भागात प्रचंड पाणी साचले होते. गेल्या आठ वर्षांत एका दिवसातील पावसाचा तो उच्चांक होता. परिणामी आंबिल ओढा कोपला अन नागरिकांवर संकट कोसळले.

