पुणे – टेमघर धरणाचे बांधकाम निकृष्ट पद्धतीने केल्याप्रकरणी व धरणाच्या पाणी गळती प्रकरणी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तत्कालीन २३ अभियंत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.टेमघरच्या खराब बांधकामासंदर्भात शासनातर्फे मुकुंद विठ्ठल म्याकल (४२) यांनी फिर्याद दिलेली आहे.
लवार्डे गावाच्या हद्दीत टेमघर धरण बांधण्यात आले आहे. धरणाचे बांधकाम श्रीनिवास कन्स्ट्रक्शन प्रा.लि. आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या दोन कंपन्यांनी केले आहे. दोन्ही कंपन्यामधील ९ जणांनी व इतर २४ शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून धरणाचे बांधकाम करताना बनावट व कमी दर्जाचे साहित्य वापरून धरणाची गुणवत्ता राखली नाही. तसेच खोटे दस्तावेज करून शासनाच्या निधीचा अपहार करून फसवणूक केली. धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी धरणाची पाहाणी केली. त्यावेळी त्यांनी धरणाचे बांधकाम योग्यरितीने झाल्याचे सांगितले होते. नंतर मात्र घुमजाव करीत धरणाचे बांधकाम योग्यरित्या झाले नसल्याचे सांगून चौकशी चालू केली.
संबंधित कंपन्यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचे समोर आले आहे. कंपन्यांनी काही शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचे समोर आले आहे. धरण बांधकामवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कामाची गुणवत्ता न राखता गुणवत्तेनुसार काम पूर्ण केले नाही. त्यानंतर एकूण ३४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणात आपली अटक टळावी यासाठी तत्कालीन २३ अभियंत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार काम पाहात आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांच्या न्यायालयात ८ सप्टेंबर रोजी या सर्वांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. दिलीप शिवाजी गोडसे (६०, रा. कोथरूड), अशोक नरसिंह लोलप (६६, विठ्लवाडी), सुभाष नागनाथ पाटील (६९, पौड), रमेश बाबुभाई गालीयाल (५८, कोंढवा), शंगर आबाजी पवार (६२, वारजे), रविकुमार विष्णू जावडेकर (७६, शिवाजीनगर), चंद्रकांत शंकर देवकर (६१, रा. कोथरूड), आनंदकुमार श्रीकृष्ण माने (५३, नाशीक), वासुदेव कृष्णाजी लोमटे (५७, पर्वती), संजय आबाजी टिळेकर (५४, रा. वडगांव बुद्रुक), विकास गंगाधर गंगाथडे (५९, रा. कात्रज), बबन भिवा डेरे (५७, वडगांव बुद्रुक), त्रिबंक अनंत देशपांडे (५४, बावधन), दत्तात्रय निवृत्ती रासकर (५९, हडपसर), रामराव दत्तात्रय पाटील (५६, कोल्हापूर), राजन रामचंद्र ताकवले (६१, कोथरूड), विजय रमेश शिंदे (५९, कोथरूड), सतिश दत्तात्रय कोकाटे (५५, विमाननगर), हिंदुराव केरबा धामणकर (५२, कोल्हापूर), जगन्नाथ येताला सुर्यवंशी (५३, भोसलेनगर), अनिल विष्णुपंत हुडके (६१ धनकवडी), जयंत रघुनाथ पिंपलोदकर (६५, चिंचवड), यशवंत गोविंद टंटक (६८, हडपसर) अशी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या तत्कालीन अभियंत्यांची नावे आहेत.
टेमघर निकृष्ट बांधकाम प्रकरण -२३ अभियंत्यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव
Date:

