तेहसीन पूनावाला ,मोनिका वढेरा यांनी अपंग मुलांसमवेत साजरा केला बालदिन(व्हिडीओ )
पुणे : एक मूल एक झाड… अशी हाक चिमुकल्यांपर्यंत पोहोचवत त्यांच्यासोबत वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश तरुणाईने दिला. काही ना काही कारणाने अपंगत्त्व आलेल्यांना प्रेमाचे बळ देत तरुणाईने अपंग मुलांसोबत अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा केला. एरवी संस्थेतील आपल्याच मित्रांसोबत गप्पा मारणा-या चिमुकल्यांना आज नवे मित्र मिळाल्याने त्यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वहात होता. यावेळी गाणी-गोष्टींनी रंगलेल्या गप्पांसोबतच स्नेहभोजनाचा आस्वादही मुलांनी घेतला.
निमित्त होते, वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेमध्ये ह्युमॅनिटी हेल्पिंग हँडस् या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित स्नेहभोजन आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे. कॉंग्रेसचे युवा नेते तेहसीन पूनावाला, मोनिका वडेरा पूनावाला यांनी अपंग मुलांसोबत स्नेहभोजन करण्यासोबतच त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ह्युमॅनिटी हेल्पिंग हँडस् संस्थेचे संस्थापक कुमेल रझा, अध्यक्ष मूर्तुझा शेख, महिला अध्यक्ष परवीन मसिआ, बहाउद््दीन शेख, अपंग कल्याणकारी संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे, सहसचिव पोपटराव लोणकर यांसह तरुणवर्ग उपस्थित होता.
तेहसीन पूनावाला म्हणाले, अपंग मुलांसमोर मोठी आव्हाने असतात, तरीही सकारात्मकरित्या जीवन कसे जगायचे याचा आदर्श मूलमंत्र मुलांनी दिला आहे. सामान्य माणूस फार छोटया संकटांना घाबरतो. परंतु ही मुले लढाऊ वृत्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहेत. बालदिनानिमित्त त्यांच्यासोबत स्नेहभोजन करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे. यापूर्वी अशा उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. यापुढेही असा मिळेल.
मोनिका वडेरा पूनावाला म्हणाल्या, बालदिनानिमित्त अपंग मुलांमध्ये मिसळण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे त्यांचे भावविश्व मला जाणून घेता आले. आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे., असेही त्यांनी सांगितले. संस्थेमध्ये चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संकल्पदेखील करण्यात आला.