महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा यांच्या वतीने गुरुपूजन सोहळा व शिक्षक पुरस्कार वितरण
पुणे : शिक्षक हे अध्यापनाच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवितात, याची जाणीव प्रत्येक शिक्षकांनी ठेवायला हवी. शिक्षकांना सन्मान, प्रेम, प्रगती करण्याच्या संधी मिळतात, सुरक्षित वातावरण मिळते तर शिक्षकांनी मुलांवर प्रेम करा आणि त्यांना चांगले शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करा. शिक्षकांनी गुरुतत्त्वाची जाणीव ठेवून वागा आणि बदल घडवा, असे मत एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा यांच्या वतीने गुरुपूजन आणि शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शाळेच्या अमृत महोत्सव सभागृहात करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, संस्था उपाध्यक्ष हिमानी गोखले, सचिव वरदेंद्र कट्टी, सहसचिव शालिनी पाटील, प्रभारी कोषाध्यक्ष डॉ. सुषमा केसकर आणि मुख्य विश्वस्त उषा वाघ उपस्थित यावेळी होत्या.
डॉ. रोहिणी पटवर्धन म्हणाल्या, शिक्षक आणि गुरु यामध्ये फरक आहे. पदवी घेऊन तुम्ही शिक्षक होऊ शकता परंतु गुरु होण्यासाठी केवळ पदवी पुरत नाही. त्यामुळे आपण शिक्षक झालो म्हणजे गुरु होत नाही. गुरु बनायचे असेल तर सतत आत्मपरिक्षण आणि अभ्यास करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. शिक्षकांनी बदलत्या समाजाशी जोडून घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
रेखा पळशीकर म्हणाल्या, आपण कायम शिकत असतो. शिक्षकांनी देखील नेहमी शिष्याच्या भूमिकेत राहून शिकत राहिले पाहिजे. सतत शिकणे हेच आपल्याला चांगल्या मागार्ला नेईल. रँग्लर र.पू. परांजपे प्राथमिक शाळेच्या पूजा नळे यांनी सूत्रसंचालन केले. वरदेंद्र कट्टी यांनी प्रास्ताविक केले. शालिनी पाटील यांनी आभार मानले.
शिक्षकांनी गुरुतत्वाची जाणीव ठेवून वागा आणि बदल घडवा-एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी पटवर्धन
Date:

