पुणे- शहराचा विस्तार जसा वाढत आहे त्याच प्रमाणात सिमेंटचे जंगल वाढत आहे. शहरातील रस्ते देखील सिमेंटचे झाले आहेत. यामुळे पाणी जमिनीत झिरपणे कमी झाल्याने शहरातील पाण्याची पातळी खालावत आहे. यावर उपाय म्हणून पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी जमिनीत झिरपण्याच्या उद्देशाने आता रस्त्यालगत ‘पोरस ब्लॉक’ बसविण्याचा प्रयोग पुणे महापालिका प्रशासनाने पुण्याचे फुफुस म्हणून गणल्या जाणाऱ्या तळजाई पठारावर केला आहे.याद्वारे केलेल्या विशेष जॉगिंग ट्रॅकचे १४ जुलै रोजी नगरसेवक सुभाष जगताप हे उद्घाटन करणार आहेत . तळजाई वर चालण्याचा व्यायाम करायला येणाऱ्या एका सदस्याकडून म्हणजे तळजाई भ्रमण मंडळाच्या सदस्याकडून हे उद्घाटन करण्यात येणार आहे . मात्र याच वेळी तळजाई चा रस्ता हा रायडींग ट्रॅक बनू नये याची दक्षता घेण्यात यावी अशी मह्ग्नी येथे फिरायला येणाऱ्या मंडळीकडून होते आहे . तळजाई विकासाच्या नावाखाली जंगलाचे काँक्रिटीकरण,टेकडी फोड होऊ नये . येथे अनेक उनाड मुले भरधाव वेगाने वाहने पळवत असतात , अशा तक्रारीकडे स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे .
पुणे शहर हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे शहर झाले आहे. शहरातील मोकळी मैदाने, टेकड्या, झाडांची संख्या गेल्या काही वर्षात घटली आहे. यामुळे शहरातील पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. यातच पुणे परिसरातील नव्याने पाचशेहून अधिक किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात अली आहे. या रस्त्यांमुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचतात. यामुळे नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो तसेच रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघाताच्या घटनाही घडतात.
या सर्वांवर उपाय म्हणून पोरस ब्लॉक’चा पर्याय निवडण्यात आला आहे. याचा पहिला प्रयोग तळजाई टेकडी येथे करण्यात आला आहे. त्याठिकाणी हे पोरस ब्लॉक बसवण्यात आले असून पुढील काही महिने यावर अध्ययन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील विविध भागात हे ब्लॉक्स बसवण्याचा महापालिकेचा मानस आहे.