अरविंद एज्युकेशन सोसायटीत महाराष्ट्र फुटबॉल मिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे-जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षाखालील स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात होत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन’ अंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये फुटबॉलचे आयोजन करण्यात आले होते.
हा उपक्रम नवी सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक अतूल शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी दादा शितोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील उपस्थित राहत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यामध्ये 17 वर्षाखालील मुले-मुली सहभागी झाले होते. क्रीडाशिक्षक रामेश्वर हराळे, जीवन सोलंकी, भटू शिंदे, योगेश जैन यांनी मुलांना फुटबॉल खेळातील बारकावे सांगितले.
यावेळी अतुल शितोळे म्हणाले, लहान वयात मुलांना खेळाची आवड निर्माण व्हायला हवी. पालकांनी मुलांना खेळण्यासाठी मैदानावर पाठवावे. मोबाइलच्या जगातून बाहेर येऊन मुलांनीही मैदानावर घाम गाळावा. अधिकाधिक मुलांना फुटबॉलची आवड निर्माण व्हावी आणि खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपल्या शहराचे, राज्याचे, देशाचे नाव उंचवावे.