पिंपरी –
चिंचवड प्रभाग क्र.१० येथील इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या इमारतींची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटीचे वारे वाहत असल्याने पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर होईल, अशी सर्वांचीच भावना आहे. त्या अनुषंगाने शहरातील विवीध समस्या सोडविल्या जाणे गरजेचे आहे. वेळोवेळी शहरातील समस्यांचा पाठपुरावा करून देखिल महापालिका अधिकारी वर्गाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. असे विवीध प्रकरणांवरून नजरेस पडत आहे. विकास कामांच्या बाबतीत असणा-या विवीध समस्या सोडविणे शहर हिताचे आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव होऊ नये, अशी अपेक्षाही अमित बच्छाव यांनी व्यक्त केली.
इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथिल नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्या इमारतींचे जिने तुटलेले असून,पावसाळ्यात टेरेस-भिंतींमधून पाणी झिरपत असते, इमारतींमधील शौचालयांचे पाईप्स तुटल्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे कचरा जमा करणेकामी पालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या घंटागाड्यांपैकी एकही घंटागाडी याठिकाणी आत्तापर्यंत आलेली नाही. त्यामुळे सोसायट्यांच्या सभाेवती कच-यांचे ढिग लागले आहेत. परिणामी रोगराई पसरत आहे. येथील शौचालयांचे ड्रेनज वारंवार जाम होउन मैला बाहेर येत असतो,त्यामुळे परिसरात दुर्गधी पसरुन लोकांना त्याचा त्रास होत आहे. म्हणून ड्रेनेज लाईन्स नविन टाकण्यात याव्यात.
या भागात साचलेला कचरा, राडारोडा, डबक्यांमध्ये साचलेले घाण पाण्यामुळे या भागात डासांचा प्रादुभाव वाढला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साचुन डासोत्पती होत आहे. कचरा समस्या नेहमीचीच आहे. डास वाढल्यामुळे डेंगू, मलेरिया, अतिसार, ताप, सर्दी, खोकला व फ्ल्यू सारखे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार होत आहे.साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्याचे ठोस उपाय करावेत तथा या भागात वेळोवेळी किटक नाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. दर महिन्याला मनपाने ३-४ वेळा औषध फवारणी करावी.
येथील इमारती/घरांपर्यंत पिण्याचे पाणी व वापराचे पाणी न पोचल्यामुळे नागरीकांना खुप दुरवरून पाणी आणण्यासाठी पायपिट करावी लागते. म्हणून तेथे असणा-या टाक्यांची दुरुस्ती करण्यात यावी. भटकी कुत्री/डुकरे तेथे असणा-या नागरीकांवर वेळोवेळी हल्ला करतात, भटकी कुत्री/डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा. त्याशिवाय इतर प्रभागातील आकर्षक बाकडय़ांप्रमाणे येथेही चौकात बाकडे बसविण्यात यावेत.
इमारतींची डागडूजी, वॉटर प्रुफींग, जिन्यांची दुरूस्ती, शौचालयांचे तुटलेले पाईप्स बसविणे, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे. इमारतीची दुरूस्तीची मागणी वारंवार करून देखिल महापालिकेकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे आयुक्तांनी इंदिरानगर विभागास भेट देऊन नागरीकांच्या समस्या समजावून घ्याव्यात. तसेच या इमारती दुरूस्तीसाठी लवकरात-लवकर संबंधित विभागाला सुचना देण्यात याव्या, अशी विनंतीही अमित बच्छाव यांनी केली आहे.

