पुणे,: ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड वेलनेस’तर्फे ‘मिसेस इंडिया अर्थ २०१६’ विजेत्या प्रिनीत ग्रेवाल यांचा ‘मिसेस वर्ल्ड सूर्यदत्ता’ बहुमान देऊन काल येथे गौरव करण्यात आला. संस्थेच्या बावधन येथील परिसरात झालेल्या या कार्यक्रमात ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सौ. सुषमा चोरडिया व माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, लेखक व उद्योजक डॉ. दीपक शिकारपूर यांनी प्रिनीत ग्रेवाल यांचा मानपत्र, मानचिन्ह व मुकूट देऊन सत्कार केला.
यानिमित्त बोलताना डॉ. संजय चोरडिया म्हणाले, की पुणेकर असलेल्या प्रिनीत ग्रेवाल यांना दिल्लीतील द्वारका येथे झालेल्या ‘मिसेस इंडिया अर्थ २०१६’ या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत विजेतेपदाचा मुकूट मिळाला, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हा मुकूट आणि बहुमान मिळवण्यासाठी त्यांनी देशभरातील ४०००० हून अधिक महिलांबरोबर स्पर्धा केली आहे. त्यामुळेच या कामगिरीबद्दल त्यांचा आमच्या संस्थेत सन्मान होणे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.
सत्कारानंतर प्रश्नोत्तरांचे रंजक सत्र झाले ज्यामध्ये डॉ. चोरडिया, सौ. सुषमा, डॉ. शिकारपूर व संस्थेतील विद्यार्थ्यांनी प्रिनीत यांना त्यांची सौंदर्य स्पर्धा, शिक्षण, त्यांची नोकरी व बहुमान जिंकल्यावर काय वाटले यासंदर्भातील विविध प्रश्न विचारले.
विद्यार्थ्यांना सल्ला देताना प्रिनीत म्हणाल्या, की माझी श्रद्धा आहे, की शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, जे गरीबी, बेरोजगारी व दहशतवादाचे निर्मूलन करुन जगात बदल घडवू शकते. सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केल्यानंतरही माझ्या स्वभावात गर्विष्ठपणाला स्थान नाही, कारण आपण आपली मुळे विसरु नयेत, हा मंत्र मी नेहमी जपते. तुम्ही आयुष्यात कितीही मोठी उंची गाठलीत तरी पाय जमिनीवरच असू द्या.
सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांना शंभरपैकी गुण देण्यास सांगितले असता त्या म्हणाल्या, की मी बुद्धिमत्तेलाच १०० टक्के गुण देईन. सौंदर्य ओसरते, पण बुद्धिमत्ता ही अशी गोष्ट आहे, जी तुमच्या मस्तकावर मुकूट विराजमान करते.
डॉ. चोरडिया यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना एक रंजक संदेश दिला. ते म्हणाले, की आज मी तुम्हा सर्वांना एका पीएचडी पदवीने सन्मानित करतो. ही कोणतीही डॉक्टरेट नसून पीएचडी अक्षरांतून पॅशन (आकांक्षा), हंगर फॉर सक्सेस (यशाची भूक) आणि डिसिप्लिन (शिस्त) प्रतित होते. डॉ. चोरडिया यांच्या या संदेशाला भरगच्च सभागृहातील उपस्थित ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
प्रिनीत यांनी जॉन डीअर कंपनीत मानवी साधनसंपत्ती (एचआर) व्यावसायिक म्हणून बजावलेल्या भूमिकेबद्दल माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. शिकारपूर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
प्रिनीत यांनी संयोजकांचे, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या, की हा सत्कार सोहळा माझ्या स्मृतीत कायमचा कोरला जाईल. अशा नामवंत संस्थेत शिकण्याची संधी मिळणारे विद्यार्थी नशीबवान असल्याचे नमूद करुन त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.