पुणे : सुर्यदत्ता महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, संशोधन, माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे प्रथमच चित्रपट महोत्सव भरविण्यात आला होता. यामध्ये अनिमेशन विभागात अक्षय काकडे यास उत्कृष्ट दिग्ददर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच नॉन फिक्शन विभागात भावेश पाटील यांच्या ‘बळीराजा’ चित्रपटास तर फिक्शन विभागात सुनील वंजारी यांच्या ‘कोष’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी वैभव ठाकरे, डॉ चिन्मय खराडे आणि अवधूत नवले यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. याबरोबबरच स्पर्धेकांना त्यांच्या कलाकृतीतील वेगळेपण व त्रुटी या दोन्ही गोष्टींवरही मार्गदर्शन केले.
फिक्शन, नॉन फिक्शन आणि अनिमेशन अशा प्रमुख तीन वर्गवारीत घेण्यात आलेल्या स्पर्धेत १५ हून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाच्या बावधन शाखेच्या परिसरात हा महोत्सव पार पडला. यावेळी सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूट चे संस्थापक -संचालक संजय चोरडिया उपस्थित होते.
उत्कृष्ट कलाकृती सादर करण्यासाठी कल्पकता, सृजनशीलता आणि नाविण्यता असणे अत्यावश्यक असते.सध्याच्या पिढीत ही ताकद आहे परंतु, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटने एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला असून येत्या काळात राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सव भरविण्यासही ‘सुर्यदत्ता’ सक्षम असल्याचे गौरवोत्तगार चिल्ड्रन फिल्म सोसायटी, भारत आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार यांनी काढले.
कुमार म्हणाले की, चित्रपट निर्मिती क्षेत्रातील संधीमुळे करीयरच्या असंख्य वाटा निर्माण झाल्या आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला सुप्रसिद्ध व बहुचर्चित असा बाहुबली चित्रपट याचेच एक उत्तम उदाहरण आहे. नाविण्यपूर्ण कल्पनांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास एक सर्वोत्तम कलाकृती घडते व ती प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडू शकते, हे या चित्रपटाने सिद्ध करू दाखविले आहे. हे लक्षात घेऊन, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत व कष्टाची विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी चोरडिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली कल्पकतेला आणि क्षमतेला दडवून न ठेवता त्यातून नवनवीन प्रयोग साकारून आपल्या कल्पना शक्तीला चालना दिल्याने कल्पकतेला वाव मिळत राहतो तसेच त्यातूनच वेगवेगळ्या संधी देखील निर्माण होतात. सुर्यदत्ता नेहमीच विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पनांसाठी प्रोत्साहन देत राहील. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

