पुणे : ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’ने फेरप्रक्रिया केलेल्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून (रीसायकल्ड ईवेस्ट) रथाला जोडलेल्या पंखधारी उडत्या घोड्याची‘सूर्यरथ’ ही अभिनव कलाकृती तयार केली असून ती फिनीक्स मॉलमध्ये सध्या सुरु असलेल्या ‘आर्टेथॉन’ या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहे.
‘सूर्यरथ’ ही कलाकृती ८.६ फूट उंच, ८.३ फूट लांब आणि १००० किलो वजनाची असून ती मदरबोर्ड, सीडी, सीपीयूचे बाहेरील आवरण आदी इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तूंपासून तयार केली आहे. ही रचना दिसायला ऐतिहासिक ‘ट्रोजन मस्क्युलर हॉर्स’सारखी आहे. फिनीक्स मॉलच्या प्रवेशद्वारातच ती उभारली असून प्रेक्षकांना येत्या ९ एप्रिलपर्यंत पाहता येईल. त्यातही अधिक आकर्षण म्हणजे म्हणजे या रथात बसलेला राजाचा पुतळा व घोड्याशेजारी उभा असलेला राणीचा पुतळा खास पेशवाई पेहरावात सजवण्यात आले आहेत व दोन्ही पुतळेही फेरप्रक्रिया केलेल्या टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आले आहेत. आर्टेथॉन प्रदर्शनासाठी प्रवेश मोफत असून हे प्रदर्शन शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, पालक, शिक्षक किंवा अगदी कोणत्याही वयोगटाच्या प्रेक्षकांसाठी एक आकर्षण ठरेल. प्रेक्षक सूर्यरथात बसून स्वतःची छायाचित्रे काढून घेऊ शकतात, जेणेकरुन त्यांच्या चिरंतन आठवणींच्या ठेव्यात मोलाची भर पडेल.
या कलाकृतीमधील रथ याआधी गोविंदाच्या एका लोकप्रिय चित्रपटाच्या डेक्कन जिमखान्याजवळील नदीकाठावर झालेल्या चित्रीकरणात वापरण्यात आला होता. ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन’च्या विद्यार्थ्यांनी केवळ २४ तासांत त्याची दुरुस्ती, नूतनीकरण व सजावट केली आणि पुतळ्याच्या पेहरावांचीही आकर्षक रचना साकारली. या अभिनव संकल्पनेमागील हेतू म्हणजे फेरप्रक्रिया केलेल्या उत्पादनांना उत्तेजन देण्याबाबत लोकप्रबोधन घडवणे आणि फेरप्रक्रिया, फेरवापर व वापर कमी करणे (रीसायकल, रीयूज, रीड्युस) या तत्त्वाचे महत्त्व व गरज ठसवणे.
या संकल्पनेमागील मुख्य प्रेरणाशक्ती असलेले सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, की पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी, तसेच जगभरातील शहरे व महानगरांसाठी फेरप्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. ताज्या कच्च्या मालापासून उत्पादने बनवण्याचा खर्च फेरप्रक्रिया केलेल्या उत्पादनांपेक्षा महाग असतो. त्यामुळे शक्य तितकी फेरप्रक्रिया उत्पादने वापरुन आपण निर्सग आणि इंधन, वीज अशा उर्जेच्या स्रोतांचे पुढील पिढ्यांसाठी जतन करत या पृथ्वी ग्रहाला वाचवू शकतो.