पुणे : ‘आय क्यूब’ने घेतलेल्या ‘ऑल इंडिया ओपन इंटेलिजन्स स्कॉलरशिप एक्झॅमिनेशन २०१६-१७’ परीक्षेत ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या असाधारण कामगिरीच्या जोरावर ‘सुपर मेरिटोरियस लीग’ हा उच्च सन्मान प्राप्त केला असून या शाळेलाही ‘हाय आयक्यू स्कूल’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे.
‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना त्यांच्या शाळेच्या कामगिरीसाठी ‘हाय आयक्यू’ प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना ते म्हणाले, “प्रत्येक बालकात वेगवेगळ्या क्षेत्रांतील बुद्ध्यंकाचा एक अनोखा खजिना असतो, जो प्रशिक्षीत शिक्षकांनी खास तंत्रे अंगीकारुन शोधायचा असतो. सूर्यदत्तामध्ये ही शोधप्रक्रिया निरंतर राबवली जाते. विद्यार्थ्यांच्या क्षमता एकदा निश्चित झाल्यावर आम्ही त्या अशा पातळीपर्यंत विकसित करण्यासाठी व धारदार बनवण्यासाठी प्रयत्न करतो, की लहान वयातच ते बालक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन उच्च कौशल्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या खुल्या स्पर्धा परीक्षांत यश संपादन करते.”
‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’मधील हर्षदा कुलकर्णी, अर्शियान अफशारियान व समियार अफशारियान या तीन विद्यार्थिनींना परीक्षेतील यशाबद्दल गुणवत्ता प्रमाणपत्र व रोख पारितोषिकाने गौरवण्यात आले आहे. हर्षदा कुलकर्णी हिची तर ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’मधील ‘आय क्यूब’ची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणूनही निवड करण्यात आली आहे.
‘आय क्यूब’ ही संघटना खास पद्धतीने विद्यार्थ्यांचा एकंदर बुद्ध्यंक धारदार बनवण्याप्रती समर्पित असून ती गुणवान विद्यार्थ्यांना दीर्घकालीन शिष्यवृत्त्या देऊन त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देते. याच हेतूने ‘आय क्यूब’तर्फे ‘ऑल इंडिया ओपन इंटेलिजन्स स्कॉलरशिप एक्झॅमिनेशन’ ही परीक्षा घेतली जाते, ज्यात देशभरातील बहुतेक नामवंत शाळा सहभागी होतात. अत्यंत विश्वसनीय प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांचा एकंदर बुद्ध्यंक तपासणारी एक प्रतिष्ठित परीक्षा म्हणून ती ओळखली जाते. ही मुळात एक बुद्धिमापन चाचणी असून उच्च पातळीच्या परीक्षांसाठीची पहिली पायरी असते. या चाचणीत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे ११ पैलू अत्यंत काटेकोरपणे तपासले जातात. जसे :
· क्वान्टिटेटिव्ह ॲनॅलिसीस, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लॉजिकल रिझनिंग
· व्हिज्युअल रिझनिंग, ॲनॅलिटिकल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग
· व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिझनिंग, स्पॅशियल इंटरप्रीटेशन, लिंग्विस्टिक्स
· सोशल इंटेलिजन्स, मेमरी
या चाचणीत कोणत्याही परीक्षा मंडळाच्या इंग्लिश मिडियम स्कूल्समधील इयत्ता तिसरी ते नववीमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी अलिकडेच ही परीक्षा देशभर घेण्यात आली. उत्तरांचे अचूक मूल्यमापन करणाऱ्या ऑप्टिकल मार्क रीडरचे प्रारुप उत्तर पत्रिकेसाठी वापरण्यात आले.
‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’ला मिळालेला पुरस्कार हेच सिद्ध करतो, की ही शाळा बोर्डाच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांमधील उच्च बुद्ध्यंक शोधून त्यांचे रुपांतर भावी काळातील बुद्धिमंतात घडवून आणण्यासाठी पाया भक्कम बनवते.
कल्पकता, संस्कृती व चारित्र्य यांवरील कार्यशाळांच्या मालिका आयोजित करुन विद्यार्थ्यांची बुद्ध्यंक पातळी ममतापूर्वक वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका शीला ओक, तसेच सर्व शिक्षकांचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी अभिनंदन केले आहे.

