क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी सुनिल फुरडे
पुणे. ता. ४: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन क्रेडाई महाराष्ट्राची यंदाची ‘चेंज ऑफ गार्ड’ ही सभा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे (डिजीटल मीट) पार पडली. यावेळी क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी सुनिल फुरडे यांची निवड करण्यात आली.
” बांधकाम मजुरांच्या सुरक्षेला क्रेडाई संस्था कायमच प्राधान्य देते. बांधकाम मजुरांसाठी क्रेडाई विशेष लसीकरण मोहीम लवकरच हाती घेत आहे. या माध्यमातून राज्यातील १० लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांना तसेच सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना कोव्हीड १९ प्रतिबंधक लस मोफत देणार असल्याची घोषणा क्रेडाई महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल फुरडे यांनी यावेळी केली.
या बैठकीस क्रेडाईचे राष्ट्रीय चेअरमन सतीश मगर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, क्रेडाईच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे जितेंद्र ठक्कर, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, क्रेडाई महाराष्ट्राचे मावळते अध्यक्ष राजीव पारीख यांच्यासह क्रेडाई महाराष्ट्राचे १२०० हून अधिक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी दर महिन्यातून एकदा होणाऱ्या ‘ रेड ‘ (रियल इस्टेट डेव्हलपर्स टॉक्स) या संकल्पनेची देखील घोषणा फुरडे यांनी केली.
फुरडे म्हणाले, बांधकाम क्षेत्र हे रोजगार निर्मितीत देशात दुसऱ्या स्थानावर आहे. उदरनिर्वाहासाठी राज्यात स्थायिक झालेले अनेक संघटित, असंघटित मजूर बांधकाम क्षेत्रावर अवलंबून आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अशा कामगारांची संख्या जास्त असल्याने ही लसीकरणाची मोहीम क्रेडाई-महाराष्ट्र प्राधान्याने राज्यभर राबवणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा उभारण्यासाठी क्रेडाई-महाराष्ट्र कटिबद्ध असून नजीकच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हा उपक्रम राज्यभर पार पडेल.
ते पुढे म्हणाले की, लसीकरणासह बांधकाम क्षेत्राशी संबंधित बाजारपेठ सर्वेक्षण व प्राप्त माहितीचे शहरनिहाय संकलन करण्याचा देखील महत्त्वाकांक्षी उपक्रम क्रेडाई महाराष्ट्र लवकरच हाती घेत आहे. क्रेडाई सदस्यांकडून ग्राहकांना निःशंकपणे घर घेण्याची हमी देणारा ‘क्रेडाई है, तो भरोसा है ‘ हा ग्राहकाभिमुख उपक्रम देखील प्रभावीपणे राबवण्याचे आमचे ध्येय आहे. राज्यस्तरीय संस्थेच्या तुलनेत क्रेडाई -महाराष्ट्र ही देशातील सर्वांत मोठी संस्था असून राज्यातील ५९ शहरापर्यंत ही विस्तारली आहे तसेच याचे सर्वाधिक ३ हजार सदस्य आहेत. या सदस्यांसाठी ‘क्रेडाई, आपल्या दारी ‘ ही योजनाही संस्थेने हाती घेतले आहेत, असेही फुरडे यांनी सांगितले.
या सर्वसाधारण सभेत सुनिल फुरडे अध्यक्ष यांच्यासह प्रमोद खैरनार यांची (अध्यक्ष, नियुक्त) तर उपाध्यक्षपदी महेश साधवानी, रसिक चव्हाण, प्रफुल्ल तावरे, आय. पी, इनामदार, दीपक सूर्यवंशी, रवी कडगे यांची निवड झाली. तर सचिवपदी सुनील कोतवाल आणि शशीकांत जिद्दिमनी हे खजिनदारपदी निवडून आले. याबरोबरच सुहास मर्चंट यांची राज्य, सल्लागार समितीपदी तर अनिश शहा, संजय गुगळे, नरेंद्रसिंग जबिंदा, दिनेश ढगे, सुधीर ठाकरे, दीपक साळवी यांनी क्रेडाई महाराष्ट्राच्या सहसचिव पदाची जबाबदारी स्वीकारली.
मुद्रांक शुल्काची कपात पुढील ६ महिने तरी कायम ठेवावी : कटारिया
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतानाच क्रेडाई महाराष्ट्राच्या आजवरच्या कामगिरीबद्दल सतीश मगर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांना अथक कष्टातून यश प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहनही दिले. यावेळी शांतीलाल कटारिया यांनी मुद्रांक शुल्कात कपात, रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय हे क्रेडाईच्या पाठपुराव्यास आलेले मोठे यश असल्याचे सांगितले. तसेच मागील महिन्यापर्यंत मुद्रांक शुल्क दरात करण्यात आलेली कपात किमान पुढील ६ महिने तरी कायम ठेवावी, असे आवाहन हर्डीकर यांना केले.