स्पर्धेत एकुण 1071 खेळाडूंचा सहभाग
पुणे, 16 ऑगस्ट 2017ः डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला राज्यभरातून 1071 खेळाडूंचा विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये दि.19 ते 23ऑगस्ट 2017 या कालावधीत रंगणार आहे.
पत्रकारपरिषेदत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक व माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू राजेश शेलार यांनी सांगितले की, राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये देशभरांतील सर्वाधिक रकमेची हि स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती आणि पारितोषिके मिळून एकूण पारितोषिक रक्कम 5,50,000/- ठेवण्यात आली आहे. याशिवाय या स्पर्धेसाठी मिळणाऱ्या इतर पारितोषिकांमध्ये विजेत्यांना मर्सिडीज बेंझ तर्फे एक खास पारितोषिक देण्यात येणार आहे. या खेळाडूंना कुटूंबासह एक दिवसासाठी चालकासह मर्सिडीज बेंझ तर्फे खास गाडी वापरण्याची संधी मिळणार आहे. तसेच सर्व गटांतील विजेत्यांना मर्सिडीज बेंझ मोटारीतून स्टार ड्राईव्ह ट्रॅकला भेट देण्याची संधी मिळणार आहे. आदिदास तर्फे विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना गिफ्ट व्हाउचर प्रदान येणार आहे. एम्स प्रोचे संचालक जतिन माळी, सिग्मा वन लँडमार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक कपिल गांधी, व्हेरियंट नेटवर्क प्रोडक्शनचे बिझिनेस हेड विक्रम गुर्जर, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस प्रकाश तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, सुदेश शेलार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सुदेश शेलार हे स्वतःएक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होते आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना(पीडीटीटीए) व डेक्कन जिमखानाच्या टेबल टेनिस विभागाचे सचिव होते. क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक गुणवान खेळाडू घडावेत याकरिता सुदेश शेलार यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच, सुदेश शेलार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुदेश शेलार मेमोरियल स्पर्धा समितीतर्फे उभरत्या 10 खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेला मराठे ज्वेलर्स्, मर्सिडीज् बेंझ बी.यु.भंडारी, मोतीलाल ओस्वाल, आदिदास, हिंदुस्तान पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड, पे यु, सुराणा अँड बोथरा यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
तसेच, ही स्पर्धा 10,12,15,18, 21 वर्षाखालील, पुरूष, महिला, मिश्र प्रौढ अशा 12 विविध गटांत होणार आहे. याशिवाय खुल्या गटांत दुहेरी आणि नोवाईस गटांत एकेरी व दुहेरीचे सामने होणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांना शनिवार, दि.19 ऑगस्ट 2017रोजी सकाळी 10वाजल्यापासून होणार असून वरिष्ठ, युथ व कुमार गटांतील अंतिम फेरीचे सामने दि.21 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहेत. सब-ज्युनियर, कॅडेट, मिडजेट गटाचे सामने दि.23 ऑगस्ट 2017रोजी दुपारी 4 वाजता होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या, उपांत्य, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना आकर्षक रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून स्पर्धेतील उभरत्या गुणवान पुरुष/महिला खेळाडूलादेखील आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत राज्यभरांतून एकुण 1071 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून टेबल टेनिसविषयी खेळाडूंचा वाढता प्रतिसाद यातून लक्षात येतो. स्पर्धेत हृदया शहा, देव्यानी कुलकर्णी, प्रिथा वर्टीकर, हविश असरानी, विधी शहा, दीप्ती पाटील, शौर्य पेडणेकर, शुभम आम्रे, सृष्टी हेलंगडी, मल्लिका भांडारकर सिद्देश पांडे हे अव्वल मानांकित खेळाडू झुंजणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून दिलीप साळसकर आणि सहमुख्य रेफ्री म्हणून मधुकर लोणारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

