अँबिशियस क्रिकेट क्लबच्या व्यंकटेश दराडे ची ओव्हर हॅट्रिक कामगिरी; पीवायसीच्या अखिलेश गवळे व शिवम ठोंबरे यांची शतकी भागीदारी;
पुणे, दि.6 फेब्रुवारी 2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अखिलेश गवळे(61धावा) व शिवम ठोंबरे(51धावा) यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 2 गडी राखून पराभव करत उदघाटनाचा दिवस गाजवला. तर, दुसऱ्या सामन्यात व्यंकटेश दराडे(5-34) याने घेतलेल्या ओव्हर हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर अंबिशियस क्रिकेट क्लब संघाने युनायटेड स्पोर्ट्स संघाचा 76 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर आजपासून सुरु झालेल्या अ गटाच्या लढतीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाने 45षटकात 7बाद 232धावाचे आव्हान उभे केले. यात अजय बोरुडेने 52 चेंडूत 8 चौकार व 4 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 85 धावा केल्या. अजयला अथर्व वणवे 39, निकुंज बोबरा 36, श्रेयस जीवने 25, यश बोरामनी 15 यांनी धावा काढून साथ दिली. पीवायसीकडून अजिंक्य तुळपुळे(2-28), यश खळदकर(2-34), वैभव टेहळे(2-59)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने हे आव्हान 43.2 षटकात 8बाद 234धावा करून पूर्ण केले. यात सोहम शिंदे(36धावा) व आदर्श बोथरा(30धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 46चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघेही बाद झाल्यानंतर पीवायसी संघ 15षटकात 4 बाद 84 धावा असा अडचणीत असताना अखिलेश गवळेने 70 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 61धावा व शिवम ठोंबरेने 78 चेंडूत 51 धावा यांनी पाचव्या गड्यासाठी 136 चेंडूत 113 धावाची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन पोहोचविले. यानंतर स्वराज चव्हाण नाबाद 15, यश खळदकर 12 यांनी धावा काढून संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी अखिलेश गवळे ठरला.
डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या ब गटाच्या सामन्यात व्यंकटेश दराडे(5-34)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट क्लब संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघावर 76 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना अँबिशियस क्रिकेट क्लब संघ 42.1षटकात 203 धावावर संपुष्टात आला. यात राज नवले(62धावा) व आदित्य भोसले(27 धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 86 चेंडूत 85 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सिद्धांत दोशी 21, रोहित हाडके 21, सारिश देसाई 22 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. युनायटेड स्पोर्ट्स क्लबकडून रोनक राठी(2-30), अमन दोशी(2-19), आदित्य राजहंस(2-20), तनिष्क सीतापूरे(1-31), गौरव शिंदे(1-19) यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 31.4 षटकात 127 धावांवर कोसळला. यामध्ये स्मित पाटील(40धावा) व उत्कर्ष इनामदार(13धावा) या सलामीच्या जोडीने 57 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली. त्यानंतर गौरव शिंदे(28धावा)ने स्मित पाटीलच्या साथीत चौथ्या गडयासाठी 34चेंडूत 36 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण युनायटेड स्पोर्ट्स क्लब 21 षटकात 4बाद 94 अशा सुस्थितीत असताना फिरकी गोलंदाज व्यंकटेश दराडे(5-34)याने या षटकात ओव्हर हॅट्रिक घेत विजयाचा पाया रचला. व्यंकटेशला सरीश देसाई(3-22), श्रेयस चव्हाण 2-15) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत साथ दिली. सामन्याचा मानकरी व्यंकटेश दराडे ठरला.
स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, पीवायसी हिंदू जिमखानाचे सचिव आनंद परांजपे व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टस लिमिटेड, दापोलीचे अनिल छाजेड आणि टी.एन.सुंदर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिजुता भालेकर, ओमकार भालेकर, एमसीएचे उपाध्यक्ष अजय गुप्ते, पीवायसी हिंदू जिमखानाचे माजी क्रिकेटपटू रणजित पांडे, इंद्रजीत कामतेकर, महेंद्र गोखले, सतीश पेडणेकर, अविनाश रानडे, माधव रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:गट अ: डेक्कन जिमखाना: 45षटकात 7बाद 232धावा(अजय बोरुडे 85(52,8×4,4×6), अथर्व वणवे 39(63,3×4), निकुंज बोबरा 36(64,4×4), श्रेयस जीवने 25(46), यश बोरामनी 15, अजिंक्य तुळपुळे 2-28, यश खळदकर 2-34, वैभव टेहळे 2-59) पराभूत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 43.2 षटकात 8 बाद 234धावा(अखिलेश गवळे 61(70, 8×4), शिवम ठोंबरे 51(78,4×4,2×6), सोहम शिंदे 36(49), आदर्श बोथरा 30, स्वराज चव्हाण नाबाद 15, यश खळदकर 12, अजय बोरुडे 2-30, हितेन बनसोडे 2-45, यश बोरामनी 1-39);सामनावीर-यश खळदकर; पीवायसी संघ 2 गडी राखून विजयी;
गट ब:अँबिशियस क्रिकेट क्लब: 42.1षटकात सर्वबाद 203 धावा(राज नवले 62(64,10×4,1×6), आदित्य भोसले 27(43), सिद्धांत दोशी 21(12), रोहित हाडके 21(30), सारिश देसाई 22(32), रोनक राठी 2-30, अमन दोशी 2-19, आदित्य राजहंस 2-20, तनिष्क सीतापूरे 1-31, गौरव शिंदे 1-19) वि.वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 31.4 षटकात सर्वबाद 127धावा(स्मित पाटील 40(48,4×4), उत्कर्ष इनामदार 13, गौरव शिंदे 28(33), व्यंकटेश दराडे 5-34, सरीश देसाई 3-22, श्रेयस चव्हाण 2-15);सामनावीर-व्यंकटेश दराडे; अंबिशियस क्रिकेट क्लब 76 धावांनी विजयी.

