टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या दुहेरीसाठी लिएन्डर पेसला वाईल्ड कार्ड कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा भारतातच खेळणार
पुणे: महान टेनिस पटू लिएन्डर पेस याला टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील दुहेरीसाठी वाईल्ड कार्ड द्वारे थेट प्रवेश देण्यात आला असून त्यामुळे तो पुण्यात अखेरची स्पर्धा खेळण्यासाठी परतत आहे. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी संकुलात 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
सर्वांना अपेक्षित असलेली लिएन्डरला वाईल्ड कार्ड देण्याची घोषणा आज पार पडलेल्या स्पर्धेच्या ड्रॉ समारंभात करण्यात आली. यावेळी स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, खजिनदार संजय खंदारे, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या उपस्थितीत हा ड्रॉ संभारम पार पडला. यावेळी भारताचा अव्वल टेनिस पटू प्रजनेश गुणनेश्वरण व इटलीचा स्टार खेळाडू स्टेफानो ट्रॅव्हेगलिया उपस्थित होते.
46 वर्षीय लिएन्डर पेस यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्दनच्या साथीत खेळणार असून पहिल्या फेरीत या जोडीसमोर भारताचा स्टार खेळाडू आणि गटविजेता दिविज शरण आणि न्यूझीलंडचा आरटेम सीटकच्या यांचे आव्हान असेल. गेल्या वर्षी दिविज शरण याने रोहन बोपन्नाच्या साथीत दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
लिएन्डरच्या वाईल्ड कार्डची घोषणा करताना स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, पेस सारख्या महान खेळाडूंचे पुण्यात स्वागत करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहव. लिएन्डर याने देशाची दीर्घकाळ सेवा केली असून भारताला अनेक बहुमान मिळवून दिले आहेत. तसेच, लिएन्डर मुळे भारताच्या युवा खेळाडूंना नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. लिएन्डर सारख्या महान खेळाडूला अखेरच्या स्पर्धेत खेलताना पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
यासंबंधी अधिक माहिती देताना सुंदर अय्यर म्हणाले की, दक्षिण आशियातील एकमेव एटीपी टूर स्पर्धा असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेतुन आपले अखेरचे पदारपणा करण्यासाठी लिएन्डर उत्सुक आहे. 8 ग्रँड स्लॅम करंडक जिंकणारा लिएन्डर अखेरच्या वेळी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. लिएन्डर याने देशासाठी केलेल्या प्रदीर्घ सेवेचा बहुमान म्हणून त्याला वाईल्ड कार्ड देण्याचा निर्णय आम्ही घेतला.
भारताचा आणखी एक अव्वल दुहेरी टेनिसपटू रोहन बोपन्ना हा स्थानिक खेळाडू अर्जुन काढेच्या साथीत दुहेरीत खेळणार असून पहिल्या फेरीत त्यांच्यासमोर अँटोनी होआंग आणि बेनॉय पेर या फ्रेंच जोडीचे आव्हान असणार आहे.
दरम्यान एकेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये प्रजनेश गुणनेश्वरण पुढे स्लामीला यांनीक मेडेन याचे आव्हान असून भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू सुमित नागल याला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून प्रवेश केलेल्या खेळाडूशी सामना करावा लागणार आहे.