पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या 29 ऑक्टोबर ते 19 नेव्हेंबर 2017 या कालावधीत पुणे, पिपरी चिंचवड, बारामती, खेड या ठिकाणी रंगणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी सांगितले की, पुणे जिल्हातील सर्व तालुक्यांमधील 20 वर्षाखालील सुमारे दीड हजार कुमार मुले व मुली यांचा सहभाग असलेली स्पर्धा ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ ठरणार आहे. प्रो-कबड्डीला जिल्हातून मिळालेला प्रतिसाद लक्षात घाता जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू व राज्य कबड्डी संघटनेचे केशाध्यक्ष शांताराम जाधव स्पर्धेचे तांत्रिक संचालक असणार आहेत. स्पर्धेला मॅक्स लींक यांचा पाठिंबा लाभला आहे. या स्पर्धेचे आयोजन एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड संचालक कौस्तुभ देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली केले जाईल.
स्पर्धेतील सामन्यांची 4 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून ग्रुप स्टेज बाद पध्दतीने खेळण्यात येणार आहे. यामध्ये खेड विभागातील खेड, जुन्नर, शुरूर व आंबेगाव तालुक्यांची स्पर्धा 29 ऑक्टोबरला खेड येथे होईल. राजगुरूनगर, पिंपरी-चिंचवड, मावळ व मुळशी तालुक्यांची स्पर्धा 4 नोव्हेंबरला निगडी येथे होईल. पुणे शहर, भोर व वेल्हे तालुक्यातील खेळाडूंची स्पर्धा 5 नोव्हेंबरला पुण्यात होईल तर बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यातील खेळाडूंची स्पर्धा 11 नोव्हेंबरला बारामती येथे होणार आहे. या सर्व ठिकाणच्या स्पर्धा त्या त्या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार असल्याचे पवार यांनी मनुद केले.
स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेता व उपविजेता संघात(मुले व मुली) 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे सुपर प्लेऑफ सामने होणार आहेत. पहिल्या फेरीत सामने व्यावसायिक मॅट फिल्डवर लीग-कम-नॉक आऊट स्वरूपात खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकुण 3 लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार असून विजेत्या संघाला 50 हजार रूपये, उपविजेत्या संघाला 35 हजार रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. यशिवाय उत्कृष्ट खेळाडूसाठी आकर्षक पारितोषिते देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.