पुणे- संजय टकले गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर रॅली करतो आहे. त्याने साधलेली प्रगती पाहून मी प्रभावित झालो आहे. त्याची शिकण्याची वृत्ती सुद्धा कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रीया भारताला अव्वल रॅली ड्रायव्हर गौरव गील याने व्यक्त केली.
गौरव कोईमतूरमधील खास ट्रॅकवर रॅलीचे प्रशिक्षण देतो. संजयने गेल्या शनिवारी-रविवारी दोन दिवसांची रॅली स्कूल कार्यशाळा पूर्ण केली. त्यानिमित्त संपर्क साधला असता गौरव म्हणाला की, संजयने माझ्या रॅली स्कूलमध्ये येणे फार चांगली गोष्ट आहे. त्याने अलिकडेच स्वतःच्या मालकीची मित्सुबिशी मिराज आर5 कार खरेदी केली आहे. कारकिर्दीला प्रारंभ केला तेव्हाच्या तुलनेत संजयने मोठी मजल मारली आहे.
प्रशिक्षणामागील उद्देशांविषयी गौरवने सांगितले की, संजयने आणखी वरची पातळी गाठावी म्हणून पुढील वर्षभरात त्याला आणखी वेगवान रॅली ड्रायव्हर बनविण्याचा प्रयत्न राहील.
संजयचे कौशल्य आणि दृष्टिकोनाविषयी तो म्हणाला की, अ दर्जाचा रॅली ड्रायव्हर बनता यावे म्हणून संजयकडे शिकण्याची वृत्ती आहे. माझ्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून मी नेहमीच खुला दृष्टिकोन ठेवतो. भारतीय रॅली ड्रायव्हरनी एपीआरसीपर्यंत मजल मारावी असे मला वाटते.
रॅली ट्रॅकविषयी त्याने सांगितले की, ट्रॅक फार तांत्रिक आहे. वेगवान आणि संथ वळणे आहेत. रॅली ड्रायव्हिंगचे सर्व पैलू येथे आत्मसात करता येतात.
भारताचे महत्त्वाचे रेसिंग सेंटर मानल्या जाणाऱ्या कोईमतूरमधील प्रसिद्ध पवनचक्क्यांच्या परिसरात हा ट्रॅक आहे. सहा किलोमीटर अंतराची एक रॅली स्टेजच तेथे तयार करण्यात आली आहे. त्यात हेअरपीन, वळणावळणांचा मार्ग, डावी अन्् उजवी वळणे, जम्प, खोलगट भाग, खडकाळ भाग, वाळुचा भाग असे विविध प्रकारचे अडथळे आहेत. एक सरळ मार्गही आहे. त्यावर ताशी दिडशे किलोमीटर वेग राखता येतो. दोन्ही बाजूंना झुडपे आहेत. भारतीय राष्ट्रीय रेसिंग मालिकेची (आयएनआरसी) एक फेरी कोईमतूरला होते, तेव्हा या परिसरात स्टेज होतात.
संजयने अधिक माहिती देताना सांगितले की, चेट्टीनाड रेसिंगचे प्रमुख तसेच मुख्य ट्यूनर त्यागराजन यांनी कार्यशाळेसाठी दोन पोलो रेस कार दिल्या होत्या. दोन्ही दिवस दोन सत्र झाली. शनिवारी सकाळी 10.30 ते 1 आणि दुपारी 2 ते 5, तर रविवारी सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुपारी 1.30 ते 4 अशी सत्र झाली. गौरवने आधी मला दोन फेऱ्या मारायला सांगितले. तेव्हा कारमध्ये कुणी नॅव्हीगेटर नव्हता. नंतर तो स्वतः बसला. मी दोन लॅप मारले. त्याने माझ्या तंत्राचा अंदाज घेतला. मी काय सरस करू शकतो हे सांगितले. मग त्याने स्वतः दोन फेऱ्या मारल्या. मग त्याच्या सल्यानुसार काही बाबींचा अवलंब करीत मी फेऱ्या मारल्या. सुरवातीला एक कार पंक्चर झाली. आम्ही दुसरी कार वापरली. त्यात वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाला. तोपर्यंत आधीची कार सज्ज करण्यात आली होती. एकूण कार्यशाळ
कोणत्या तांत्रिक बाबी शिकता आल्या, या प्रश्नावर संजय म्हणाला की, वळणावर कारची स्थिती (कार पोझीशनिंग) कशी ठेवायची, ब्रेक कोणत्या ठिकाणी मारायचा (ब्रेकींग पॉइंट), टायरच्या खुणांच्या भागात कार कशी ठेवायची (रट् लाईन्स) असे मुद्द महत्त्वाचे असतात. ड्रायव्हिंगच्या वेळी त्यात अचूकता साधल्यास वेग वाढतो. रॅलीमध्ये ग्रीप महत्त्वाची असते. त्यासाठी तीन घटक महत्त्वाचे असतात. टायर, सस्पेन्शन आणि मागील चाकांना जोडणाऱ्या दांड्याची रचना (डीफ सेटींग) यावर हे अवलंबून असते. कोणत्या प्रकारच्या मार्गावर डीफ सेटींग कसे ठेवायचे याविषयी त्याने माहिती दिली.
गौरव हा आदर्श प्रशिक्षक असल्याची भावपूर्ण प्रतिक्रिया संजयने व्यक्त केली. तो म्हणाला की, त्याचे बारीकसारीक गोष्टींकडे बारकाईने लक्ष असते. स्टीअरिंगवरील हाताची स्थिती (हँड पोझीशनिंग) घड्याळ्यात तीन किंवा नऊ वाजताना काट्यांची स्थिती कशी असते त्यानुसार असावी. त्यामुळे हात अडकत (लाॅकींग ऑफ हँड््स) नाहीत. ही सवय व्हावी म्हणून त्याने रस्त्यावर साधी कार चालविताना पण हातांची स्थिती अशीच ठेवायला सांगितले.
संजयने यापूर्वी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये ब्रिटनच्या अॅलिस्टर मॅकरे यांचे मार्गदर्शन घेतले होते. अॅलिस्टरला जागतिक रॅली मालिकेचा अनुभव आहे. त्यानंतर संजयने 2015 मध्ये स्वीडनमधील कार्लस्टड येथे ब्रिटनच्या ग्रॅहॅम मिडीलटन यांच्याकडून बर्फाळ भागात ड्रायव्हिंगचे धडे घेतले होते. सध्या मिडीलटन त्याचे एम्पार्ट संघातील प्रशिक्षक आहेत. या कार्यशाळांशी तुलना करताना संजय म्हणाला की, युरोपीय लोकांचा सिस्टीमवर भर असतो. गौरवने माझ्या मानसिक दृष्टिकोनाचा विचार केला. तो एक भारतीय आहे. त्यामुळे भारतीय कसा विचार करतात याचा त्याला अंदाज आहे. साहजिकच त्याच्याकडून बरेच बारकावे आत्मसात करता आले. भविष्यातील रॅलींमध्ये त्याचा अवलंब करून सरस कामगिरी करेन असा विश्वास वाटतो.