एफसी पुणे सिटी सर्वाधिक युवा खेळाडूंचा संघ-गौरव मोडवेल
पुणे- एफसी पुणे सिटी संघामध्ये यंदाच्या वर्षी 23वर्षाखालील 9खेळाडूंचा समावेश असून त्यामुळे हा संघ आयएसएलच्या नव्या मौसमातील सर्वाधिक युवकांचा संघ ठरला आहे. या संघातील 7पैकी 4प्रशिक्षकही पूर्णपणे नवे असून ते खेळाडूंना आज प्रथमच भेटणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण नव्या आणि ताज्या दमाच्या अशा या संघाकडून आम्हांला यंदाच्या मौसमात चमकदार व भरीव कामगिरीची अपेक्षा असल्याचे एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले.
एफसी पुणे सिटी संघाच्या नव्या मौसमातील पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मोडवेल म्हणाले की, संघात एक मार्क्वी खेळाडू असणे अनिवार्य आहे हा नियम काढल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली आहे. यामुळे आता आपण स्वतःचे मार्क्वी तयार करू. पूर्वी आयएसएलची किंवा एफसी पुणे सिटी संघाची फारशी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी नव्हती. परंतु या खेळाडूंनी एफसी पुणे सिटी संघाचा चांगला अनुभव घेतला असल्यामुळे तसेच, आयएसएल स्पर्धेचीही आता चांगली प्रसिध्दी झाली असल्यामुळे आम्हांला चांगला दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळणे अवघड जात नाही.
ऑगस्ट व सप्टेंबर हे महिने नव्या मौसमाच्या पूर्वतयारीसाठी नेहमीच महत्वाचे ठरतात. परंतु या महिन्यात आपल्याकडे नेहमीच पाऊस पडतो. त्यामुळे यापूर्वी सरावात अनेक अडचणी येत होत्या. परंतु आम्ही आता सरावासाठी अतिशय उत्तम अशी व्यवस्था केली असून याशिवाय संघाला सराव सामन्यांसाठी परदेशात पाठविण्यात येत असल्यामुळे ही अडचण दूर झाली आहे. तसेच, गेल्या वर्षी स्पेनमध्ये खेळलेल्या 9 सराव सामन्यांपैकी 7 सराव सामन्यात आम्ही विजय मिळविला होता. त्यामुळे या सराव सामन्यांचा आम्हांला निश्चितच उपयोग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाही आम्ही अशाचप्रकारे सराव सामन्यांचे आयोजन करणार आहोत.
संघात अनेक युवा खेळाडू असल्यामुळे दुखापती कमी होतील अशी एका बाजूला अपेक्षा असतानाच युवा खेळाडू स्वतःच्या शरीराबाबतीत काही निष्काळजी असल्यामुळे आम्ही खेळाडूंचा तंदरूस्ती व दुखापती याविषयी विशेष काळजी घेत आहोत. त्यासाठी आम्ही प्रीकंडिशनिंग कँप तसेच, व्यायामासाठी विशेष ङ्गिजिओ थेरपीस्ट यांची नेमणूक केली असून ते खेळाडूंना दुखापती टाळण्यासाठी खास प्रशिक्षण देणार आहेत. ही सर्व काळजी घेतल्यानंतरही दुखापती होतच असतात. त्यासाठी तज्ञ डॉक़्टरांची नेमणूक केली असून ते खेळाडूंवर अत्यंत त्यांची तंदरूस्ती कायम राखण्याचा प्रयत्न करतील.
रॅन्को पोपोविच बहुसांस्कृतिक व अनुभवी प्रशिक्षक एफसी पुणे सिटीचे नवनियुक्त रॅन्को हे अतिशय अनुभवी आणि बहुआयामी व्यक्ती आहेत. पोपोविच यांची पार्श्वभूमी अतिशय वेगळ्या स्वरूपाची आहे, असे सांगून मोडवेल म्हणाले की, पोपोविच यांच्यावर बालपणातच कुटूंबाची जबाबदारी पडली. ते केवल 13 वर्षाचे असताना युगोस्लावियाचे विभाजन झाले आणि अतिशय आव्हानात्मक अशा राजकीय परिस्थितीत त्यांनी खडतर परिश्रम करून आपल्या कूटूंबाची काळजी घेतली आणि फुटबॉल करिअर घडविले. त्यामुळे त्यांचा काहीसा आक्रमक असला तरी विविध देशांमधील संघांना प्रशिक्षण देण्याचा तसेच, फर्स्ट डिव्हिजनपासून आंतरराष्ट्रीय संघांना मार्गदर्शन करण्याचा प्रचंड अनुभव पाठिशी असल्यामुळे ते खेळाडूंशी उत्तम समन्वय साधू शकतात. तसेच, त्यांना अनेक भाषा अवगत असल्यामुळे ते खेळाडूंशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात. अशाप्रकारचे बहुसांस्कृतिक आणि अनुभवी प्रशिक्षक लाभल्यामुळे एफसी पुणे सिटी संघाची कामगिरीच निश्चितच चांगली होईल, असा आमचा विश्वास आहे.