पुणे- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती. यानंतर, अनेक नेत्यांनी अण्णांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण, अण्णा आपल्या निर्णयावर ठाम होते. आज अखेर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर अण्णा हजारेंनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘तुम्हाला कल्पना आहे की, अण्णा हजारे यांनी 30 तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने त्यांचा आग्रह होता. मागच्या काळात ज्यावेळी उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांना दिलेला आश्वासनांची बऱ्यापैकी पूर्तता झाली आहे. काही अजून मुलभूत मुद्दे ज्या मुद्द्यांसंदर्भात त्यावेळी सूचित करण्यात आले होते की, उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्यामाध्यमातून निर्णय घेतला जाईल. दुर्देवाने निवडणूक आणि कोरोनामुळे घेता आला नाही. पण आता समिती गठीत करुन सहा महिन्यात निर्णय होईल’, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, ‘अनेक वर्षे समाज, राष्ट्रहितासाठी आंदोलन करत आलो. हा घटनेने दिलेला अधिकार आहे, अन्याय आणि अत्याचार होत असेल तर शांततेत अहिंसेच्या मार्गाने लढा द्यायचा. स्वामिनाथन आयोगचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. जो खर्च आहे त्यापेक्षाव पन्नास टक्के उत्पन्न वाढवून द्या, असे त्यात म्हटले होते. त्याबाबत सरकारने आश्वासन दिले होते. पण आश्वासनांची पूर्तता झाली नव्हती. आता सरकारने आश्वासनांची पूर्तता करण्याचे पुन्हा आश्वासन दिले आहे. आम्ही 15 मुद्दे दिले होते. ते मुद्दे मान्य झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा होईल. फडणवीस यांनी सांगतलेल्या निरोपावर विश्वास ठेवून मी माझा आंदोलनाचा निर्णय मागे घेत आहे’, असे अण्णा हजारे म्हणाले.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी
अण्णा हजारे यापुर्वी म्हणाले होते की, ते 2018 पासून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची विनंती केंद्र सरकारला करत आहेत. परंतु, त्यांच्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहेत. यामुळेच उद्या म्हणजेच, 30 जानेवारीपासून अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत.

