(समीक्षक –राजेंद्र सरग-9423245456)
‘स्टार्च हवंय विचारांना!’ या शीर्षकाचा प्रतिभा शिवाजी मगर यांचा कवितासंग्रह वाचला. सामाजिक प्रबोधनपर शीर्षक असले तरी यात विविध काव्यप्रकार हाताळण्यात आले आहेत. इयत्ता आठवीपासून कविता करत असल्या तरी कवयित्रीचा हा पहिलाच कवितासंग्रह.
आशय आणि अभिव्यक्तीचा विचार केला तर प्रत्येक कविता स्वत:ची ओळख निर्माण करते. कवयित्रीने एक विशिष्ट शैली न स्वीकारता वेगवेगळ्या शैलीचा वापर केला आहे. वारी, दिंडी, गौरी शंकराचे बाळ, पांडुरंग, विठू, भोळ्या शंकरा या कवितांमधून भक्तीरस पाझरतो. तर ‘मेघाने लावला फास, ‘शेती म्हणजे ब्लू व्हेल गेम’ या सारख्या कवितांमधून संतापाचा लाव्हारस अनुभवयाला मिळतो. स्त्री शिक्षणावरची कविता ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी’ या गीताच्या चालीवर गुणगुणायला लावते तर ‘ग्रहण नव्हे ती भेट’ ही कविता ‘ग्रहण’ या खगोलीय घटनेचा वेगळा अर्थ सांगून जाते.
काही कविता तर केवळ शीर्षक वाचूनच त्यातील भावना वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात. तरीही कवयित्रीच्या मनातील संवेदना कविता वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने जाणवतात. ‘आई म्हणजे..’ , ‘बाप म्हणजे…’ , ‘मैत्री म्हणजे…’, ‘पुरुष म्हणजे…’, ‘शिक्षक म्हणजे…’, ‘कविता म्हणजे… ‘ , ‘शेती म्हणजे…’ या कविता त्याचे प्रातिनिधीक उदाहरण ठराव्यात.
कवयित्री पेशाने शिक्षीका असल्याने शाळा, विद्यार्थी, त्यांच्या बरोबर जडलेले नाते, भावी नागरिक घडवतांनाची तळमळ, त्यांच्या कडील अपेक्षा, जबाबदार आणि देशभक्त नागरिक होण्यासाठी करावे लागणारे संस्कार हे सारे कवितांमधून प्रकट झाले आहेत. वारकरी संप्रदायाचा वारसा आणि शेती संस्कृतीचे मिळालेले बाळकडू हेही आपल्याला कवितांमधून पहायला मिळते. माहेरवाशीण म्हणून माहेराच्या आठवणी, प्रबोधनकारी, संदेशपर अभंग, हायकू, भक्तीरस, शृंगाररस अशा काव्यप्रकारांनी हा कवितासंग्रह एक विविधरंगी फुलांचा गुच्छ झालेला दिसतो.
कवयित्रीने सभोवताली घडणाऱ्या घटनांवरही संवेदनशील पण कुठेही आक्रस्ताळेपणा न करता संयतपणे आपल्या भावना मांडल्या आहेत. सखोल विचारमंथनातून, अंत:प्रेरणने सुचलेले हे विचार काव्यबद्ध करतांना वाचकांच्याही मनाचा ठाव घेतात. मानवी जीवन आणि जगणे सुंदर करण्यासाठीच हा सारा खटाटोप कवितासंग्रहातून करण्यात आलेला आहे. महिला सबलीकरण, सशक्तीकरण यावरही बदलत्या स्त्री जाणिवांचा वेध घेण्यात आला आहे. ‘आधुनिक सावित्री’, ‘लक्तरं’, ‘भुकेचे आभाळ’ ‘बाईपणाचे चटके’ या कविता स्त्रीजीवनावर नव्याने प्रकाश टाकतात.
कविता ही कवयित्रीची जीवलग मैत्रीण. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे.. ‘आठवीत असतांना पहिली कविता लिहीली. वडलांनी (त्र्यंबक लोकरे) तोंड भरुन कौतुक केले. लिखाणास बळ दिले. वडिल शिक्षक तेही स्वरचित पोवाडे, एकांकिका, नाटकं सादर करीत. वडिलांच्या बदलीमुळे होणारी भ्रमंती, मग तिथल्या मातीशी जुळणारी नाळ, मैत्री, रुसवे-फुगवे, मनाची होणारी जडण-घडण यात कविता कधी अल्लड तर कधी हट्टी झाली. वयानुसार गुलाबी स्वप्नात रमू लागली. हळव्या क्षणांची सोबती झाली. वैवाहिक जीवनात एक जीवलग सखी झाली. कविता समृद्ध करण्यास कुटुंबाची साथ मिळाल्याबद्दल त्या स्वत:ला धन्य समजतात.
सभोवतालची परिस्थिती पाहून कवयित्रीचे मन चोळामोळा झालेय फाटक्या सदऱ्यासारखं .. काम, क्रोध, ईर्षा, लोभ, दंभ, गर्व आणि जिंकण्यासाठी वाट्टेल ते केले जात असल्याने अघोरी घड्या मनावर पडल्या. त्यामुळे विचारवस्त्र चुरगळून गेले आहे.
एक एक घडी निपटून काढण्यासाठी
आत्मचिंतनाच्या स्टार्चमध्ये बुडवून
सद्सद्विवेक बुद्धीची कडक इस्त्री मारुन
स्टार्च केले तर....!
पोतेरा झालेले विचारवस्त्र
‘पांडुरंगाच्या पितांबरासारखे’
पवित्र आणि सुंदर होऊन
स्वयंतेजाने चकाकणार आहे
आणि त्यातला एक एक प्रकाशकिरण
पसरलेला अंधकार मिटवणार आहे
म्हणूनच विचारांना स्टार्च हवं आहे स्टार्च… !
कवयित्रीने कल्पनेच्या विश्वात रमतांनाही वास्तव आणि समाजप्रश्नांचा विसर पडू दिलेला नाही. आत्मभान आणि समाजभान या दोन्ही टोकांच्या दरम्यान त्यांची कविता वाचकांना सहजतेने फीरवून आणते.
तू दिलीस हाती लेखणी
म्हणून चंद्रावरही गेलो
तुझ्या स्वयंप्रकाशित तेजात
साऊ आम्ही सूर्य गं झालो
या कवितेत त्या साऊ म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या विषयी ऋण व्यक्त करतात आणि तिच्या वाटेवर चालतांना संस्कार शिदोरी जपण्याचा शब्दही देतात.
ग्रहण म्हणजे सूर्य आणि चंद्र या दोन भावांची भेट. असा नवा विचार मांडतांना ‘कृष्णाची परीक्षा’ या कवितेत राधेला पहाण्याची ओढ कान्हाला लागू दे, असंही कवयित्री राधेला सुचवते
कृष्णासही विरहाचे
सोसु दे चटके जरा
घे सावळयाची परीक्षा
राधिके हटकी जरा
जीवनाची व्यामिश्रता लक्षात घेता कवयित्रीने जीवनप्रवासात प्रत्यक्षरित्या आणि कल्पनेत अनुभवलेल्या भावनांचे विश्व हे प्रतिभा आणि काव्यातून वाचकांसमोर उभे केले आहे. हे जीवनविषयक चिंतनविश्व वाचकांना नवी अनुभूती देईल, अशी आशा आहे.
कवयित्री – प्रतिभा मगर
मुखपृष्ठ – अरविंद शेलार
प्रकाशक –परिस पब्लिकेशन, सासवड (जि. पुणे)
पृष्ठं- 120
किंमत- 150 रुपये

